
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
गेल्या काही दिवसांपासून महाक्षय (मिमोह) आणि बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष शर्मा यांची मुलगी मदालसा शर्मा यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. या दोघांचे ७ जुलैला लग्न होणार होते, परंतु त्यापूर्वीच त्याच्यावर बलात्कारासारखा गंभीर आरोप करण्यात आला होता.
आता मिळालेल्या माहितीनुसार, मिमोह याचे लग्न ७ जुलैला उदगमंडलम (ऊटी) येथील एका पॉश हॉटेलमध्ये होणार होते. पण बलात्कारासारख्या गंभीर आरोपामुळे शर्मा कुटुंबाने हे लग्न मोडले. भोजपुरी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्रीने मिमोहवर बलात्काराचा आरोप केला आहे. पीडितेने न्यायालयात या प्रकरणी दाद मागितली आहे असुन सदर प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहे.
मिमोहने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण केल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. पीडितेने आपल्या तक्रारीमध्ये नमूद केले आहे की, मिमोहने २०१५ मध्ये शीतपेयामध्ये नशा येणारा पदार्थ मिसळून बलात्कार केला. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने शारीरिक शोषण केले. हे दोघे ४ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. या दरम्यान पीडित अभिनेत्री गर्भवती राहिली आणि मिमोहने जबरदस्ती गोळ्या खाऊ घालून गर्भपात केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
























































