
एसटी कामगार नेते, माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांची जगण्याची एक वेगळी पद्धत होती. कोणत्याही कार्यामधील चिकाटी आणि जिद्द त्यांनी कधी सोडली नाही. एसटी कामगाराला न्याय देणे हे त्यांचे स्वप्न होते, ते पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष, आमदार सचिन अहिर व्यक्त केल्या.
काँग्रेसचे नेते, महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड (73) यांचे 10 जानेवारी रोजी नाशिक येथे हृदयविकाराने निधन झाले. महाराष्ट्र इंटकच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या मनोहर फाळके सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सचिन अहिर बोलत होते. ‘इंटक असेल किंवा एसटी कामगार संघटना असेल, त्यांनी शेवटपर्यंत तळमळीने कार्य केले आहे. कामगार चळवळीत गांधी विचार रुजविण्याचा त्यांनी प्रयत्न केला,’ असे महाराष्ट्र इंटकचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते म्हणाले. महाराष्ट्र इंटकचे कार्याध्यक्ष निवृत्ती देसाई, कार्याध्यक्ष कैलास कदम, खजिनदार देवराज सिंग, उपाध्यक्ष अनिल गणाचार्य, मुंबई जिल्हा अध्यक्ष दिवाकर दळवी, सिटूचे नेते सय्यद अहमद, पुणे येथील इंटकचे राजेंद्र खराडे, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे उपाध्यक्ष राजन लाड, संघाचे उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, सुनील बोरकर, सेव्रेटरी शिवाजी काळे, जी. बी. गावडे आदी यावेळी उपस्थित होते.

























































