
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
तिवरे धरणाप्रमाणेच मोरवणे धरण धोकादायक बनले असून ग्रामस्थांनी तक्रार करताच प्रशासन खडबडून जागे झाले. आमदार सदानंद चव्हाण यांनी देखील मंगळवारी धरणावर धाव घेऊन प्रशासनाला तातडीने आदेश दिले, त्यानुसार धरणातील पाण्याचा दाब कमी करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.
चिपळूण तिवरे येथील धरण दुर्घटना ताजी असतानाच येथील मोरवणे येथील धरणाला गळती लागल्याची माहिती पुढे आली आणि एकच घबरहाट निर्माण झाली. मोरवणे ग्रामस्थांनी दोन रात्र जागून काढल्या, तर जिल्हा नियोजन समिती सदस्य अनिल चव्हाण यांनी थेट लघु पाटबंधारे कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना चक्क धारेवर धरले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी धरणावर धाव घेतली. मात्र कोणतीच उपाययोजना न करता फक्त ग्रामस्थांना दक्षता घेण्याचे आदेश देऊन पाठ फिरवली.
चव्हाण यांनी या विषयाची दखल घेत मंगळवारी थेट धरणावर धाव घेतली. यावेळी तहसीलदार जीवन देसाई, लघु पाटबंधारे विभागाचे श्री.सोनवणे,जिल्हा नियोजन समिती सदस्य अनिल चव्हाण, सरपंच मुकुंद चव्हाण उपस्थित होते. पूर्ण धरणाची यावेळी पाहणी करण्यात आली. धरणाला गळती लागली असून मोठ्या प्रमाणात झाडे उगवली आहेत. तसेच धरणाचे पिचिंग देखील उडाले आहेत. एका ठिकाणी माती खचली आहे. ही परिस्थिती धोकादायक असून आम.चव्हाण यांनी या बाबत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून या परिस्थितीत काय करावे लागेल या बाबत अनेक सूचना देऊन तातडीने काम सुरू करण्याचे आदेश देखील दिले. त्यानुसार तात्काळ कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
धरण आता पूर्ण क्षमतेने भरले असल्याने दुरुस्ती करणे शक्य नाही, त्यामुळे प्रथम धरणातील पाण्याचा दाब कमी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पाणी कमी केल्यानंतर जॅकवेलच्या माध्यमातून पाणी सोडून नंतर लगेच गळती काढण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. तसेच या धरणावर सुरक्षा रक्षक तैनात करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. या धरणाच्या पायथ्याशी देखील वस्ती आहे. तसेच आजूबाजूला बौद्धवाडी, चर्मकार वाडी आणि खालचीवाडी असे तीन वाड्या आहेत.
























































