
सामना ऑनलाईन । मुंबई
वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) तसेच पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या सुशोभीकरणासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) लाखो रुपये खर्च करून नवे आकर्षक फलक लावण्यास सुरुवात केली आहे. पण त्यावर चोरटय़ांनी डल्ला मारला आहे. महामार्गावरील अनेक ठिकाणचे फलक तसेच धातूचे रेलिंग्ज अज्ञात चोरटे पळवून नेत असल्याच्या घटना घडत आहेत.
बीकेसी आणि दोन्ही महामार्गांवरील जुने फलक काढून एमएमआरडीए नवेकोरे फलक लावत आहे. त्यावर एमएमआरडीएचा नवा लोगोसुद्धा आहे. प्रवासी आणि पर्यटकांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहचण्यासाठी ते मार्गदर्शक ठरतात. बरोबरच या फलकांमुळे एमएमआरडीएची जाहिरातही होते. पण ते सुरक्षित राहावेत यासाठी काळजी घेतली गेली नसल्याने चोरटय़ांचे फावले आहे.
बीकेसीमध्ये एमएमआरडीएने 100 नवे फलक लावले आहेत. पश्चिम द्रुतगती महामार्गावरही उंचावर फलक लावले जात आहेत. या फलकांसाठी एक कोटीपेक्षा जास्त रक्कम खर्च केली जाणार असल्याची माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱयांनी दिली. या फलकांचा प्रवासी वाहनांना फायदाच होणार आहे, पण चोरटय़ांपासून त्यांची सुरक्षा कशी करावी असा प्रश्न अधिकाऱयांना पडला आहे. महामार्गांवर अपघात होऊ नयेत म्हणून लावण्यात आलेले रेलिंग्जचे पत्रेही चोरीला जात असल्याचे अधिकारी सांगतात.
नवे फलक चोरीला गेल्याची माहिती अद्याप माझ्यापर्यंत आलेली नाही, पण तशा घटना घडल्या असतील तर निश्चितच पोलिसांकडे तक्रार केली जाईल. त्याबद्दल माहिती घेऊन सूचना दिल्या जातील.
आर. ए. राजीव, आयुक्त, एमएमआरडीए
























































