
सामना प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील उड्डाणपुलाखाली सुरक्षेच्या कारणास्तव पार्किंग लॉट, वेअरहाऊस उभारू नये, भंगार ठेवू नये असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. ते धाब्यावर बसवून पूर्व द्रुतगती मार्गावरील टागोरनगर-कन्नमवार नगर जंक्शन उड्डाणपूल, कांजूर उड्डाणपूल आणि नाहूर-मुलुंड पुलाखाली मेट्रोचे वेअरहाऊस थाटण्याचा डाव एमएमआरडीएने घातला आहे. त्यास शिवसेनेने तीव्र विरोध दर्शविला असून आठ दिवसांत वेअरहाऊसचे काम न थांबवल्यास उभारलेले कंपाऊंड उखडून टाकण्याचा इशारा शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी दिला आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे उड्डाणपुलाखाली वाहनांचे पार्किंग करता येत नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे रिकाम्या पडून असलेल्या पूर्व द्रुतगती मार्गावरील टागोरनगर, कांजूर आणि नाहूर-मुलुंड उड्डाणपुलाखालच्या जागेचे सुशोभीकरण आणि नागरिकांकरिता मॉर्निंग वॉक ट्रक उभारण्यासाठी शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी)परवानगी मागितली होती. मात्र एमएसआरडीसीच्या प्रशासनाने त्याकडे साफ दुर्लक्ष करत जनहिताच्या कामाला बगल देत एमएमआरडीएच्या माध्यमातून सदर जागा वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली या मेट्रो मार्गाच्या वेअरहाऊससाठी नाममात्र भाडय़ाने दिली आहे. त्यानुसार त्याचे कामही सुरू झाले आहे.
शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी त्याची गंभीर दखल घेत आज जागेची पाहणी केली. सुशोभीकरणाबरोबरच मॉर्निंग वॉकचा ट्रक उभारण्यासाठी जागा न देता मेट्रोच्या वेअरहाऊसला दिल्याने परिसरात अवजड वाहनांचा वावर वाढणार असल्याने वाहतूककोंडी, अपघाताचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे सुरू असलेले वेअरहाऊसचे काम आठ दिवसांत न थांबविल्यास शिवसेना ते बंद पाडील असा इशारा आमदार सुनील राऊत यांनी दिला. यावेळी नगरसेवक उपेंद्र सावंत, उपविभागप्रमुख शेखर जाधव, अनंत पाताडे, शाखाप्रमुख अभय राणे, राजेश सोनावणे, जितू माने आदी उपस्थित होते.
कुठे माशी शिंकली?
कन्नमवार नगर, टागोर नगरबरोबरचे मुलुंडचे शेकडो रहिवासी मॉर्निंग वॉकला पूर्व द्रुतगती मार्गावर येतात, पण भरधाव जाणाऱया वाहनांमुळे अपघाताची भीती आहे. त्या पार्श्वभूमीवर टागोरनगर, कांजूर आणि नाहूर-मुलुंड उड्डाणपुलाखालच्या रिकाम्या जागेत सुशोभीकरण आणि मॉर्निंग ट्रक उभारण्यासाठी आमदार सुनील राऊत यांनी एमएसआरडीसीकडे एनओसी मागितली होती. त्यानुसार झालेल्या बैठकीत व्यवस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार यांनी लवकरच एनओसी देऊ असे स्पष्ट केले होते. मात्र आता येथे मेट्रोचे वेअरहाऊस होत असल्याचे पाहून कुठे माशी शिंकली असा सवाल सुनील राऊत यांनी केला आहे.
summary- mmrda to plan a metro warehouse under eastern express highway fob

























































