मल्लखांबाला ऑलिम्पिक खेळाचा टिळा लावण्यासाठी एमओएची अमेरिकेला साथ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या मऱहाठमोळ्या मल्लखांब खेळाला 2028 सालच्या ऑलिम्पिकमध्ये प्रदर्शनीय खेळ म्हणून मान्यता मिळावी म्हणून आता हिंदुस्थानी मल्लखांब महासंघाला आता अमेरिकन मल्लखांब महासंघाचीही साथ लाभणार आहे. 2028 सालचे ऑलिम्पिक लॉस एंजिल्सला होत असून तोपर्यंत मल्लखांब अमेरिकेच्या प्रत्येक राज्यात पोहोचवण्याचे ध्येय समोर ठेवल्याची माहिती अमेरिकेतील मल्लखांबचे प्रशिक्षक चिन्मय पाटणकर यांनी दिली. या ध्येयाला गाठण्याची स्फूर्ती महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या (एमओए) पाठिंब्यामुळे मिळाल्याचेही त्यांनी अभिमानाने सांगितले.

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना मूळ हिंदुस्थानी खेळ असलेल्या मल्लखांबाला ऑलिम्पिक चळवळीचा भाग बनविण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि हा खेळ आपल्या राष्ट्रीय खेळांचा अविभाज्य भाग आहे. आम्हाला आमच्या खेळाचे आंतरराष्ट्रीय क्षेत्रात जागतिकीकरण करण्याचे प्रयत्न आहेत.

मल्लखांबला केवळ एक प्रदर्शनीय नव्हे तर ऑलिम्पिक खेळ म्हणून ओळखला जावा, हे आमचे प्रयत्न आहेत आणि त्यात ऑलिम्पिक संघटना नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी बोलून दाखवला. एमओएचा पाठिंबा असलेल्या या पत्रकार परिषदेला एमओएचे नामदेव शिरगावकर, सिने कलाकार राकेश बापटही उपस्थित होते.

या परिषदेत मल्लखांबला जगाच्या कानाकोपऱ्यात नेण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि प्रत्येक हिंदुस्थानीने त्याचा सराव करून तो सर्वांपर्यंत पोहोचवायला हवा, असे आवाहनही पाटणकर यांनी केले. ऑलिम्पिकच्या मार्गावर आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा यांसारख्या सर्व स्पर्धांमध्ये मल्लखांबला प्रदर्शित करण्याचे आमचे ध्येय असले पाहिजे, असेही ते म्हणाले. आसाममध्ये होणाऱया जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अमेरिकन आणि हिंदुस्थानी संघ कशी कामगिरी करतात हे पाहण्याजोगे असेल, तसेच, निर्माते राकेश बापट यांच्याकडून मल्लखांबच्या प्रगतीची माहिती देणाऱया माहितीपटाचे अनावरण करण्यात आले.