अंगणवाड्यांचे कामकाज होणार पेपरलेस, मोबाईल अ‍ॅपमध्ये भरावी लागणार माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mobile-phone

सामना प्रतिनिधी । नगर

जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांतील कामकाज आता ऑनलाइन होणार आहे. यासाठी अंगणवाडी कर्मचार्‍यांना मोबाइल देण्यात आले आहेत. या मोबाइलमध्ये दैनंदीन कामकाजाच्या नोंदी घ्याव्या लागणार आहेत. अंगणवाड्यांतील बालकांचे वजन, पोषण आहार, लसीकरण, दैनंदीन अहवाल यासारखी माहिती मोबाइलद्वारे भरावी लागणार आहे. यासाठी एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने मोबाइल अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपद्वारेच कामकाज करावे लागणार आहे.

मे महिन्यापासून अंगणवाड्यातील कामकाज ऑनलाइन पद्धतीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार अंगणवाड्यांतील कामकाज मोबाइलद्वारे केले जाणार आहे.

अंगणवाड्यातील आहार वाटप, बालकांचे लसीकरण, बालकांचे नियमितपणे वजन करुन नोंदी घेणे यासह अन्य कामकाज असते. या कामकाजाचे अहवाल तयार करावे लागतात. मात्र, यापुढे अंगणवाड्यांतील हे काम ऑनलाइन केले जाणार आहे. यासाठी कर्मचार्‍यांना अँड्रॉइड मोबाइल देण्यात आले आहेत. या मोबाइलमधील अ‍ॅपमध्ये नोंदी घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे कागदावरील कामकाज कमी होणार आहे. अ‍ॅपमध्ये माहिती भरल्यानंतर राज्य सरकार तसेच जिल्हास्तरावरील कार्यालयांनाही ऑनलाइन माहिती मिळणार आहे. येत्या 1 मेपासून नगर जिल्ह्यात या पद्धतीने कामकाज सुरू होणार आहे. जिल्ह्यातील जवळपास अंगणवाडी कर्मचार्‍यांना मोबाइल देण्यात आले आहेत.