
नगरपरिषदेच्या गलथान कारभाराचा फटका मोहोळकरांना बसला असून, त्यांच्यासमोर पाणीटंचाईचे तीव्र संकट उभे राहिले आहे. पाणीपुरवठा विभागाचे 20 लाख रुपयांचे वीज बिल थकल्यामुळे ‘महावितरण’ने पाणीपुरवठ्याचे कनेक्शन तोडले आहे. नगरपरिषद जोपर्यंत बिलाचा भरणा करणार नाही, तोपर्यंत मोहोळकरांवर पाणीटंचाईचे संकट कायम राहणार आहे.
माजी नगराध्यक्ष रमेश बारस्कर यांनी नगरपालिकेने तातडीने वीज बिल भरून वीज आणि पाणीपुरवठा सुरळीत करावा, नागरिकांना वेठीस धरू नये, असे निवेदन नगरपरिषद आणि वीज महामंडळाला दिले आहे. मोहोळपासून जवळच असलेल्या सीना नदीतील आष्टी कोळेगाव बंधाऱ्यातून मोहोळ शहराला पाणीपुरवठा केला जातो. या पाणीपुरवठ्याच्या विजेचे बिल गेल्या सहा महिन्यांपासून थकले आहे. हे बिल सुमारे 18 लाख 50 हजार रुपयांवर गेले आहे. वीज बिल भरण्यासाठी वीज मंडळाने वारंवार मागणी करूनदेखील मोहोळ नगरपरिषदेने बिल भरलेले नाही. नगरपरिषदेचा गलथान कारभार, गैरव्यवहार आणि भ्रष्टाचारामुळे आर्थिक स्थिती डबघाईला आल्यामुळे बिल भरण्यात आले नसल्याची चर्चा सुरू आहे.
ऐन उन्हाळ्यात उन्हाचे तीव्र चटके बसत असताना, मोहोळ शहराचा पाणीपुरवठा विजेअभावी बंद झाला आहे. यामुळे आता नगरपरिषद केव्हा वीज बिल भरते आणि पाण्याच्या त्रासातून नागरिकांची सुटका कधी होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. सध्या गेला महिनाभर पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत मोटारी नादुरुस्त झाल्यामुळे पाणीपुरवठा खंडीत झाला आहे.
याबाबत माजी नगराध्यक्ष रमेश बारस्कर यांनी मोहोळ नगरपरिषद आणि वीज मंडळाला निवेदन दिले आहे. ‘दोन्ही संस्था नागरिकांसाठी काम करीत असून, एकमेकांवर कुरघोडी न करता जनतेच्या हितासाठी नगरपालिकेने पैसे भरावेत व वीज मंडळाने वीज देऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा,’ असे निवेदनात म्हटले आहे. शहराचा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बारस्कर यांनी दिला आहे.
वीज मंडळाने 18 लाख 50 हजारांचे बिल दिले आहे. त्यापैकी 10 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला असून, उद्या वीज जोडली जाणार आहे. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल. बंद व नादुरुस्त मोटारी तातडीने दुरुस्त करून सर्व भागांना पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल.
– अमित लोमटे, पाणीपुरवठा अधिकारी, मोहोळ

























































