
कोरोना विषाणूपाठोपाठ मंकीपॉक्सच्या वाढत्या संसर्गाने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. मागील आठवडय़ात 11 देशांपर्यंत पोहोचलेला मंकीपॉक्सचा संसर्ग आता 20 हून अधिक देशांमध्ये फैलावला आहे, तर जवळपास 200 रुग्ण आढळले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येकडे लक्ष वेधत जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) सर्व देशांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. मंकीपॉक्सची महामारी आटोक्यात आणली जाऊ शकते. या आजारावर उपलब्ध असलेल्या औषधांचे तसेच लसींचे संपूर्ण जगभरात समान वितरण केले पाहिजे, असे ‘डब्ल्यूएचओ’ने शुक्रवारी ऍलर्ट जारी करताना नमूद केले. मंकीपॉक्सच्या संसर्गाचा उद्रेक नेमका कशापासून झाला? विषाणूमध्ये झालेला आनुवंशिक बदल हे मंकीपॉक्सच्या महामारीचे कारण आहे का? अशा विविध प्रश्नांची उत्तरे अजून मिळायची आहेत, असेही ‘डब्ल्यूएचओ’ने म्हटले आहे.
























































