जून महिना सुरू होऊन अठरा दिवस उलटले आहेत. मात्र जिल्ह्यात दमदार पाऊस बरसला नाही. यंदा पाऊस वेळेत हजेरी लावणार असे अंदाज वर्तवण्यात येत असल्यानं शेतकऱ्यांनी कापसाची पेरणी केली. मागील चार दिवसात जिल्ह्यातील काही भागात तूरळत पाऊस झाला खरा, मात्र तापमानाचा आकडा 40°c च्या कमी झालेलं नाही.
ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीलाच कापसाची पेरणी केली. त्या शेतात अंकुर फुटले आहेत. वातावरण असंच राहिलं तर दुबार पेरणीचे संकट ओढावेल ही चिंता बळीराजाला सतावत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून लवकर येईल या आधारावर जिल्ह्यातील जवळपास एक हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली. पाऊसच आला नसल्यामुळे बियाणे उगवण्याची शक्यता मावळत आहे. काही दिवस पावसाचा असाच खंड पडला तर शेतकऱ्यांवर दुबार बियाणे खरेदीची वेळ येण्याची भीती बळीराजाला आहे.
कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकरी पेरणीसाठी पावसाची वाट बघत असल्याच चित्र जिल्ह्यात निर्माण झालं आहे. विदर्भात मान्सून अद्यापही सक्रिय झाला नाही याचे कारण सांगताना प्राध्यापक सुरेश चोपणे म्हणाले, गेल्या दशकापासून मॉन्सून 15 दिवस पुढे गेला आहे. त्यामुळे मान्सून जून मध्ये फारसा सशक्त दिसत नाही. विशेषतः अरबी समुद्राकडून येणारे मान्सून वारे कमजोर असतात तर विदर्भात बंगालच्या खाडी कडून येणारे वारे पाऊस घेऊन येत असतात असे चित्र आहे.