
सामना प्रतिनिधी । पुणे
उसाचा थकीत रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) तातडीने द्यावा, दुधाचे कोसळणारे भाव रोखण्यासाठी २५ लाख टन दूधभुकटीचा बफर स्टॉक करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे येत्या शुक्रवारी (दि. २९) सकाळी अकरा वाजता अलका चौकापासून साखर संकुलावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सरकारने ऊस उत्पादकांना एफआरपी आणि त्यावर दोनशे रुपये देण्याचे कबूल केले होते. मध्यंतरी दर कोसळल्यामुळे कारखान्यांसमोर अडचणी होत्या. त्यामुळे आम्ही संयम राखला. आता सरकारने साखरेचा दर प्रतिक्विंटल २९०० रुपये ठरविला आहे. त्यानुसार राज्य सहकारी बँकेकडून कारखान्यांना कर्जाची उचल मिळणार आहे. त्याच्या अंमलबजावणीचा आदेश सरकारने काढण्याची गरज आहे. बाजारातील स्थिती सकारात्मक असल्याने तातडीने एफआरपीची रक्कम द्यावी; अन्यथा संघटना तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही शेट्टी यांनी यावेळी दिला.
भाकरी फिरवता फिरवता आमचा तवादेखील करपला
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाकरी फिरवायची म्हणून युतीला साथ दिली. त्यानंतर सत्तांतरदेखील झाले. मात्र, भाकरी फिरविता फिरविता आमचा तवादेखील करपून गेला, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी सदाभाऊंना टोला लगावला. निवडणुकीत कोणत्या पक्षाबरोबर जायचे याचा निर्णय अद्यापि झालेला नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

































































