
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानातील बँका आणि सार्वजनिक संस्थांना लुबाडून १२१ मोस्ट वॉटेंड गुन्हेगार २४ देशांमध्ये जाऊन लपले आहेत. ज्या २४ देशांमध्ये हे गुन्हेगार लपले आहेत त्यांच्याबरोबर हिंदुस्थानचा गुन्हेगार प्रत्यार्पण करारही आहे. मात्र, असे असताना त्यांना परत आणण्यात यश आलेले नाही. यातील ३१ हिंदुस्थानी ४० हजार घेऊन फरार झाले आहेत. मोस्ट वॉण्टेडपैकी ७० टक्के गुन्हेगारांनी ब्रिटन, अमेरिका, यूएई आणि कॅनडा या देशांमध्येच आश्रय घेतला आहेनीरव मोदीने केली जास्त लुटमार
हिरे व्यापारी नीरव मोदी, उद्योजक विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी, जतीन मेहता, ललित मोदी यांच्यासह ३१ हिंदुस्थानी देशातील एकूण ४० हजार कोटी घेऊन फरार झाले आहेत. त्यांच्यावर ईडी आणि सीबीआयने १५ विविध गुन्हे दाखल केले आहेत. नीरव मोदीने सगळय़ात जास्त, १३ हजार ५०० कोटींचा घोटाळा केला आहे.
ब्रिटनमध्येच का आश्रय
ब्रिटनमध्ये जगातील कोणतीही व्यक्ती आश्रय घेऊ शकते. कायदेशीर राजकीय आश्रय न घेताही व्यक्तीला पाच वर्षे ब्रिटनमध्ये राहता येते. पाच वर्षांनंतरही त्या व्यक्तीच्या देशातील परिस्थितीत फरक पडला नाही तर हा कालावधी वाढवला जातो. ब्रिटनने युरोपियन कन्व्हेंशन ऑन हय़ुमन राईट्स (ईसीएचआर) या करारावर सही केली आहे. त्यानुसार, कोणत्याही व्यक्तीला ब्रिटनमधून प्रत्यार्पित केले गेल्यावर त्याला कठोर शिक्षा, फाशीची शिक्षा किंवा त्याच्या प्रत्यार्पणामागे काही राजकीय कारणे आहेत, असे आढळल्यास त्या व्यक्तीचे प्रर्त्यापण ब्रिटिश न्यायालय रद्द करू शकते.
– ब्रिटनमध्ये ७५ हजार हिंदुस्थानी बेकायदेशीरपणे राहतात. विजय मल्ल्या, नीरव मोदीलाही राजकीय आश्रय न देता त्यांचाही बेकायदेशीरपणे राहणाऱया हिंदुस्थानी लोकांच्या यादीत समावेश करण्यात आला तर त्यांचे प्रत्यार्पण होऊ शकते. ब्रिटनने नुकतेच हिंदुस्थानबरोबर बेकायदेशीरपणे राहणाऱ्या हिंदुस्थानींसंबंधात सामंजस्य करार केला आहे. या कराराची अंमलबजावणी झाली तर ७५ हजार हिंदुस्थानींना परत आणता येणार आहे.
– ब्रिटनमधील स्थलांतरितांच्या विभागात अर्ज दिल्यानंतर ६ महिन्यांत अर्जाला मान्यता मिळते. या संदर्भात काही कायदेशीर समस्या निर्माण झाल्याच तर एक वर्ष लागते. आता तर फास्ट ट्रक विभाग सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार, केवळ २२ दिवसांत अर्जाला मान्यता मिळते. मार्च २०१८ पर्यंत १४ हजार १६६ जणांना राजकीय आश्रय देण्यात आला आहे. राजकीय आश्रय घेतलेल्या व्यक्तीला ब्रिटन सरकार आर्थिक मदतही करते.
ब्रिटन ठरतेय आश्रयस्थान
हिंदुस्थानातून राजकीय, आर्थिक आणि अन्य प्रकरणी गुन्हे करून पळालेल्या फरारांचे ब्रिटन हे आश्रयस्थान ठरत आहे. पंजाब नॅशनल बँकेत १३ हजार ५०० कोटी रुपयांचा घोटाळा करणारा हिरे व्यापारी नीरव मोदी यानेही ब्रिटनकडे राजकीय आश्रय मागितला आहे. त्या आधीच ललित मोदी, विजय मल्ल्या, संगीतकार नदीम सैफी, टायगर हनीफ, संजीव चावला, रवी शंकरन, लॉर्ड सुधीर चौधरी, राजकुमार पटेल, राजेश कपूर आणि अब्दुल शाकूर यांनी ब्रिटनमध्ये आश्रय घेतला आहे. २०१३ पासून ५,५०० हिंदुस्थानींनी आतापर्यंत ब्रिटनकडे राजकीय आश्रयासाठी अर्ज केला आहे.
४८ देशांबरोबर प्रत्यार्पण करार
हिंदुस्थानची आतापर्यंत ४८ देशांबरोबर गुन्हेगार प्रत्यार्पण करार झालेला आहे. ब्रिटनबरोबर २६ वर्षांआधीच झाला आहे. अमेरिका, ब्रिटन, यूएई, हाँगकाँग, बेल्जियम, बुल्गेरिया, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, पोलंड, पोर्तुगाल, स्पेन, स्वित्झर्लंड या देशांबरोबर प्रत्यार्पण करार आहे.
आतापर्यंत केवळ ६५ जणांचे प्रत्यार्पण
हिंदुस्थानने २००२ ते मार्च २०१८ पर्यंत ६५ जणांचे प्रत्यार्पण केले आहे. सगळय़ात जास्त प्रर्त्यापण संयुक्त अरब अमिरातीमधून (यूएई) झाले आहेत. आतापर्यंत मोनिका बेदी, अबू सालेम, अब्दुल सत्तार, छोटा राजन, अब्दुल रौफ मर्चंट यांचे प्रत्यार्पण झाले आहेत.


























































