
सामना प्रतिनिधी, मुंबई
उत्पन्न वाढवण्याबरोबरच शेतकऱ्यांना शेतमाल साठवण्यासाठी किफायतशीर दरात सेवा उपलब्ध करून देण्यासासाठी एसटी महामंडळ आता मालवाहतूक सेवा सुरू करणार आहे. त्याचबरोबर गोदामांच्या व्यवसायातही महामंडळ उतरणार आहे, अशी घोषणा परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज केली.
प्रवासी वाहतुकीनंतर आता एसटी महामंडळ मालवाहतूक क्षेत्रात पदार्पण करणार आहे. याबाबतचे सादरीकरण सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित केलेल्या बैठकीत करण्यात आले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकत्याच झालेल्या चर्चेनुसार एसटीची मालवाहतूक आणि गोदामांची सेवा लवकरच सुरू करण्यात येईल, असे रावते यांनी यावेळी सांगितले.
मालवाहतूक वाहनांमध्ये रूपांतर
मालवाहतूक सेवेसाठी स्वतंत्र वाहने वापरण्यात येणार आहेत. सध्याच्या वापरातील प्रवासी वाहनांचे नऊ वर्षांनंतर सर्व तांत्रिक बाबी पडताळून मालवाहतूक वाहनांमध्ये रूपांतरण करण्यात येईल. त्यानंतर ही वाहने मालवाहतुकीसाठी वापरण्यात येतील. कृषिमाल, अन्नधान्य, भाजीपाला, फळे, व्यापारी माल, स्टेशनरी आदी सर्व प्रकारच्या मान्यताप्राप्त मालाची वाहतूक करण्यात येईल. विशेष करून ग्रामीण भागातील शेतकऱयांचा माल शहरी बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्यासाठी या सेवेचा वापर होईल, असे रावते म्हणाले.
मालवाहतुकीची तरतूद
प्रवासी वाहतुकीबरोबरच मालवाहतूक करण्याबाबत कायद्यात तरतूद आहे. आतापर्यंत या तरतुदीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते, पण रावते यांनी या मालवाहतुकीच्या तरतुदीचा आता वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे रेल्वे मालवाहतुकीच्या धर्तीवर आता एसटीचीही मालवाहतूक सुरू करण्याची योजना आहे. मालवाहतुकीमुळे एसटी महामंडाळाच्या उत्पन्नात चांगली भर पडणार आहे.
शेतकऱ्यांसाठी गोदामे
राज्यातील 301 ठिकाणी गोदामे बांधता येऊ शकतील असे यावेळी सांगण्यात आले. तीन टप्प्यांमध्ये गोदामे बांधण्यात येतील. त्याचा फायदा शेतकऱयांना माल साठवण्यासाठी होईल.
तीन हजार बसचे रूपांतर
महामंडळाच्या मालवाहतूक सेवेत रेशन धान्य, पोषण आहाराचे धान्य आदींची वाहतूक करण्याची योजना आहे. यासाठी महामंडळाच्या सुमारे तीन हजार जुन्या प्रवासी बसेसचे मालवाहतूक वाहनांमध्ये रूपांतरण करण्यात येईल. काही नवीन मालवाहतूक वाहने खरेदी करण्यात येतील.


























































