बच्चूशेठ वाडीतील ‘मुजऱ्या’ला टाळे,ढोलकी, तबलावादक, नर्तकींची उपासमार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

ग्रामीण भागातील लावणीची भुरळ कुणाला नाही? दक्षिण मुंबईतील कोठय़ांवर रात्री-अपरात्री रंगणाऱ्या मुजऱ्यांचेही तसेच आहे. मुजरा म्हटले की ‘मुकद्दर का सिकंदर’ या हिंदी चित्रपटातील ‘जोहराबाई’च्या भूमिकेतील हृदयाची तार छेडणारी भावव्याकूळ रेखा आठवते. ‘सलामे इश्क मेरी जान’ या 1978 मध्ये लताने गायलेल्या गाण्यामुळे दक्षिण मुंबईतील कोठय़ांवरील मुजऱ्यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली, परंतु अलीकडे मुंबईत डान्स बार वाढल्याने संगीताची ही कलाकेंद्रे ओस पडू लागली आहेत. महाराष्ट्र शासनाने मनोरंजनाचे परवाने वितरित करणे बंद केल्याने तर ही कला जोपासणाऱ्या नर्तकी, तबला, ढोलकी, पेटीवाल्यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे अशी माहिती तेथील मुजरा कलावंतांनी दिली.

दक्षिण मुंबईतील काँग्रेस हाऊस (लॅमिंग्टन रोड) व ‘बच्चू शेठ’ वाडीतील मुजरे बहुचर्चित आहेत. परंतु जुन्या फोरास रोड (आता निमकर रोड) येथील ‘बच्चू शेठ’ वाडीतील मुजऱ्यांच्या माडय़ांना पोलिसांनी आता टाळे ठोकले आहे. महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष अरुण नलावडे यापूर्वी मनोरंजनाच्या नावाखाली वर्षभरासाठी परवाना वितरित करीत होते, परंतु गेल्या मार्च महिन्यात असे तात्पुरते देण्यात येत असलेले परवाने राज्य शासनाने वितरित करणे बंद केले आहे. त्यामुळे कोणताही परवाना नसताना तुम्हाला तुमच्या कोठय़ांवर मुजऱ्याचा कार्यक्रम आयोजित करता येणार नाही. तक्रार आली व तेथे काही अनुचित प्रकार घडला तर आम्हाला कारवाई करावी लागेल, असेही नागपाडा पोलिसांनी मुजरा आयोजकांना बजावले आहे. मुजऱ्यासाठी असलेल्या माडय़ाही धोकादायक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

बच्चू शेठ वाडीतील मुजरा परंपरेला 130 वर्षांचा इतिहास आहे. फोरास रोड म्हटले की पूर्वी लोक नाक मुरडायचे. तरीही बच्चू शेठ वाडीतील ‘मुजरे’ तुफान चालायचे. सुरांच्या मैफलीत लोक डुंबायचे. तबला आणि ढोलकीच्या तालावर कलाकार पोरी आपली अदाकारी पेश करून रसिकांची मने जिंकायच्या. आजही त्याच ताकदीच्या सौंदर्याने ओतप्रोत भरलेल्या नर्तकी आमच्याकडे आहेत. तेथे तुम्हाला कुठेही अश्लीलता दिसणार नाही. सर्वजणी अंगभर कपडय़ात असतात. तरीही संगीताची कला जोपासणाऱ्या बच्चू शेठ वाडीतील कलावंत व त्यांच्या 500 कुटुंबीयांवर अन्याय का, असा सवाल करून तेथील एक नर्तकी म्हणाली, आम्हाला उदरनिर्वाहाचे कोणतेच साधन नाही. आम्ही आमची कला पेश करून चार पैसे कमावत होतो. त्यातून मुलांच्या शाळा-कॉलेजचा प्रवासाचा खर्च निघायचा. पोटापाण्याचा प्रश्न मिटायचा. परंतु आता आमच्या बच्चू शेठ वाडीतील 25-30 घरांवर कुऱहाड कोसळली आहे. कोणताही परवाना नसल्याचे कारण सांगून पोलीस मुजरा चालू करू देत नाहीत. मग आम्ही आता करायचे काय? आम्हाला आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असाही त्यांनी इशारा दिला आहे.

त्या काळचे बहुचर्चित तबलावादक आमीर हुसेन खाँसाहेब, हबीबुद्दीन खाँसाहेब (संगतसम्राट), अहमद जान आदी तबलावादकांनी बच्चू शेठ वाडीतील मुजऱ्यांना प्रतिष्ठा व नाव मिळवून दिले. त्यांचा राष्ट्रपतींनी पद्मश्री देऊन गौरवही केला आणि मग आता बच्चू शेठ वाडीतील संगीत कलाकार शासनाला नकोसे का झाले, असाही सवाल बच्चू शेठ वाडीतील मुजरा आयोजक करीत आहेत. आर. आर. पाटील गृहमंत्री असताना त्यांनी आमच्या समस्या जाणून घेतल्या होत्या व आम्हाला रात्री दीडपर्यंत मुजरा साजरा करण्याची मुभा दिली होती. परंतु सरकार बदलले, आबाही गेले आणि आमचा संसार उघडय़ावर पडला, असेही एका वृद्ध नर्तिकेने दै. ‘सामना’ प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.