बांदिवडेकरांनी काँग्रेसला फसवले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

काँग्रेसने रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून नवीनचंद्र बांदिवडेकरांना उमेदवारी जाहीर केली. मात्र बांदिवडेकरांचा संबंध सनातन संस्थेशी असल्याचा आरोप झाल्याने काँग्रेसमधूनच त्यांच्या उमेदवारीला विरोध होत आहे. ‘सनातन’ने बांदिवडेकरांचा संस्थेशी संबंध नसल्याचे परिपत्रक काढले असले तरी स्वतः प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्यांच्या उमेदवारीचा फेरविचार करावा लागेल, असे ट्विट केले. यामुळे बांदिवडेकरांचा पत्ता कट होऊन त्यांच्या जागी रमेश कीर यांची वर्णी लागणार हे जवळजवळ निश्चित मानले जात आहे.

नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी ‘सनातन’शी आपले संबंध नसल्याचे सांगत वैभव राऊत भंडारी समाजासाठी कार्य करत होता. त्यामुळे वैभव राऊतच्या समर्थनार्थ नालासोपारा येथील स्थानिक नागरिकांनी रॅली काढली होती. वैभव राऊतचं भंडारी समाजासाठीचं काम पाहून मी त्या रॅलीत सहभागी झालो होतो. सनातन ही जातीयवाद संस्था आहे, मात्र मी सामाजिक कार्यकर्ता असल्याने कोणत्याही एका जातीसाठी करत नाही असे स्पष्टीकरण दिले. यानंतर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हेही त्यांच्या समर्थनार्थ आले. मात्र खुद्द प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीच काँग्रेस सनातनसारख्या कट्टरवादी विचारांच्या विरोधात आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करून पक्ष बांदिवडेकरांच्या उमेदवारीबाबत योग्य निर्णय घेईल, असे ट्विट केल्याने काँग्रेस बांदिवडेकरांना पर्याय शोधत असल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रवादीकडूनही रत्नागिरीचा उमेदवार बदलण्याची मागणी मित्रपक्ष काँग्रेसकडे केली जात होती. त्यामुळे बांदिवडेकरांच्या जागी काँग्रेसचे रत्नागिरीतील जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.