बेस्ट कामगारांच्या संपाला 100 टक्के प्रतिसाद; मुंबईकरांची जीवनवाहिनी पूर्णपणे ठप्प, सरनाईकांची मध्यस्थी निष्फळ; कृती समिती संप सुरूच ठेवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आर्थिक प्रश्नांसह विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या बेमुदत संपामुळे शुक्रवारी पहिल्या दिवशी बेस्टची बससेवा पूर्णपणे ठप्प झाली. दिवसभरात बेस्ट बसची एकही फेरी पूर्ण होऊ शकली नाही. संपाला सर्व कामगारांनी उत्स्फूर्तपणे 100 टक्के प्रतिसाद दिल्याचा दावा संयुक्त कृती समितीने केला. संप मिटवण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा मध्यस्थीचा प्रयत्न निष्फळ ठरला. केवळ आश्वासनावर समाधान न मानता संप सुरूच ठेवण्याचा पवित्रा कृती समितीने जाहीर केला. बेस्ट बससेवा पूर्णतः बंद राहिल्याने लाखो मुंबईकरांचे हाल झाले.

आर्थिक तोटय़ातून वाटचाल करीत असलेल्या बेस्ट कर्मचाऱयांचे विविध आर्थिक प्रश्न गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहेत. ते प्रश्न सोडविण्याबाबत कामगार संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून बेस्टच्या तब्बल 12 कामगार संघटनांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला. सरकार व प्रशासनाविरुद्ध असंतोष खदखदत असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी पूर्ण रात्रभर बेस्ट आगार परिसरातच मुक्काम ठोकला. त्यामुळे सर्वच 27 आगारांत सकाळच्या पहिल्या फेरीपासूनच संपाचा परिणाम जाणवला. बस सेवा पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे लाखो मुंबईकरांचे हाल झाले.

ठोस निर्णय होईपर्यंत मागे हटणार नाही! – कृती समितीचा आक्रमक पवित्रा

परिवहन मंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीने पत्रकार परिषद घेतली. आम्हाला सरकार स्तरावर बैठका लावण्याचे आश्वासन परिवहन मंत्र्यांनी दिले. मात्र आम्हाला आता बैठका, आश्वासने नको. महापालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टला समाविष्ट करणे, तसेच इतर प्रलंबित मागण्यांबाबत सरकारकडून ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलनापासून मागे हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा संयुक्त कृती समितीचे नेते, आमदार सचिन अहिर यांनी जाहीर केला. यावेळी ऍड. उदय आंबोणकर, डॉ. नितीन नांदगावकर, गौरीशंकर खोत, नितीन पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कायदा हातात घेतल्यास कारवाई

बेस्टची बससेवा तसेच मुंबईतील वीजपुरवठा अखंडित ठेवणे अत्यावश्यक असल्याने, बेस्ट उपक्रमांतर्गत पुरविल्या जाणाऱया सेवा अत्यावश्यक सेवांच्या वर्गवारीत येतात. या पार्श्वभूमीवर संघटनांनी पुकारलेल्या संपाच्या अनुषंगाने सरकारने ‘महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम, 2022 (मेस्मा)’ अंतर्गत बेस्ट उपक्रमातील कायमस्वरूपी व कंत्राटी कर्मचाऱयांना संपावर जाण्यास कायदेशीर प्रतिबंध घातला आहे.

मेट्रो वन, भुयारी मेट्रोसह इतर मेट्रो मार्गिकांवर गर्दी

अंधेरी, घाटकोपरमध्ये एकही बस न धावल्यामुळे वर्सोवा-घाटकोपरमधील मेट्रो मार्गिकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली. अंधेरीत मेट्रो वन मार्गिकेवर दिवसभरात तब्बल 60 हजारांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. मेट्रो प्रशासनाने 10 अतिरिक्त मेट्रो फेऱया चालवून वाढीव प्रवासी संख्येचे योग्य नियोजन केले.

राव, लाड यांच्या आवाहनाला कामगारांनी ‘फाटय़ावर’ मारले

बेस्ट कर्मचाऱयांनी संपावर जाऊ नये म्हणून सत्ताधाऱयांच्या गोटातील शशांक राव आणि प्रसाद लाड यांनी मागील दोन दिवस दबावाचे आणि दहशतीचे प्रयत्न केले. त्यांनी शिवीगाळ करीत आवाहन केले होते. त्यामुळे कर्मचारी संतप्त झाले होते. त्याच संतापातून कर्मचाऱयांनी राव आणि लाड यांचे आवाहन ‘फाटय़ावर’ मारले.

नगरविकास मंत्री, बेस्ट समिती अध्यक्षांची संपकर्त्यांकडे पाठ

वारंवार आश्वासने देऊन प्रश्न प्रलंबित ठेवणाऱ्या नगरविकास विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे आणि बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांची संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कृती समितीसोबत बैठक घेण्यास उदासीनता दिसली. समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत विश्वासराव गैरहजर राहिल्या, तर एकनाथ शिंदेंनी सरनाईकांना पुढे केले.

कामगार संघटनांचे नेते पोलिसांच्या ताब्यात

संप रोखण्यासाठी सरकारने पोलीस यंत्रणेचा वापर केला. संयुक्त कृती समितीचे नेतृत्व करणाऱया ऍड. उदय आंबोणकर यांना पोलिसांनी मध्यरात्री त्यांच्या घरातून ताब्यात घेत जवळपास 12 तास पोलीस ठाण्यात ठेवले होते. त्यानंतर विकास पोवार, प्रकाश राणे आणि रणजीत घाडीगावकर या प्रमुख पदाधिकाऱयांनाही चुनाभट्टी पोलिसांनी ताब्यात घेतले.

रिक्षा, टॅक्सीकडून प्रवाशांची लुटालूट

बेस्ट बससेवेच्या संपाचा शहर परिसरात टॅक्सी आणि उपनगरांमध्ये रिक्षाचालकांनी चांगलाच फायदा उठवला. एरव्ही शेअर रिक्षाचा व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांनी मनमानी भाडेवसुली केली. प्रवाशांनी देखील आपली गैरसोय दूर करण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मर्जीनुसार वाढीव भाडे दिले. मध्यरात्री सुरू केलेल्या संपाची अनेक प्रवाशांना कल्पना नव्हती त्यामुळे कित्येक बस थांब्यांवर सकाळी नऊ वाजेपर्यंत रांगा होत्या. या प्रवाशांनी बराच वेळ वाया गेल्यामुळे रिक्षाला वाढीव भाडे देऊन रेल्वे स्थानक गाठले.