बेस्टच्या कर्मचाऱ्यांचे आज आझाद मैदानात आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई 

बेस्टची ढासळती आर्थिक स्थिती, प्रशासनाचे आडमुठे धोरण, पालिका आयुक्तांची मुजोरी, बेस्ट महाव्यवस्थापकांचा मनमानी कारभार याच्या निषेधार्थ बेस्ट कामगार शुक्रवारी पालिका मुख्यालयाला घेराव घालणार आहेत. ‘आयुक्त-महाव्यस्थापक हटाव’ असा नारा कामगार संघटनांनी दिला आहे. मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन, बेस्ट कामगार क्रांती संघ व बेस्ट कामगार सेना या संघटनांच्या नेतृत्वाखाली शेकडो कामगार आझाद मैदानात जमणार आहेत.

बेस्टमधील सद्यस्थिती, प्रशासनाचे आडमुठे धोरण, बेस्ट महाव्यवस्थापकांचा मनमानी कारभार, निवृत्त कामगारांची रोखण्यात आलेली ग्रॅच्युइटी आदी मागण्यांसाठी बेस्टमधील शिवसेनाप्रणीत बेस्ट कामगार सेना, विद्युत पुरवठा विभागातील मान्यताप्राप्त कामगार संघटना, मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन व बेस्ट कामगार संघ या संघटनानी एकत्र येऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका आयुक्त व बेस्ट महाव्यवस्थापकांना हटवण्याची मोहीम सुरू केली असून २० जुलैपासून द्वारसभांच्या माध्यमातून हल्लाबोल आंदोलन केले जाते आहे. येत्या ६ जुलैला पालिका कार्यालयाला घेराव घालणार असल्याची माहिती संघटनांचे नेते विठ्ठल गायकवाड, सुहास सामंत यांनी दिली.

काय आहेत मागण्या
-बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबतचा रोखून ठेवलेला ठराव मार्गी लावावा.
-दर महिन्याच्या १ ० तारखेला वेतन देण्याचा शब्द पाळावा.
-निवृत्त कर्मचाऱयांची रोखलेली ग्रॅच्युइटी व अचानक बंद केलेला एक वर्षाकरिताचा मोफत बसपास पुन्हा सुरू करावा.
-रजेचे रोखीकरण, रजा प्रवास भत्ता पुन्हा सुरू करावा, कालबाह्य झालेल्या ट्रायमॅक्सच्या मशीनमुळे बेस्टचे होणारे कोटींचे नुकसान आदी.