झोपडपट्टय़ा-चाळींपेक्षा बिल्डिंगमध्येच जास्त फैलाव, बारा दिवसांत चौदाशे इमारतींमध्ये ‘प्रतिबंध’ वाढले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना झोपडपट्टय़ा-चाळींपेक्षा इमारतींमध्येच कोरोनाचा फैलाव सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. 1 सप्टेंबरपासून 12 सप्टेंबरपर्यंत फक्त 12 दिवसांत इमारतींमधील कंटेन्मेंट झोनची संख्या तब्बल 1387 इतकी वाढून 7680 वर पोहोचली आहे. तर झोपडपट्टय़ा-चाळींमध्ये मात्र प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या 20 ने कमी होऊन 557 झाली आहे. त्यामुळे बडय़ा सोसायटय़ा आणि इमारतींमध्ये कोरोना रोखण्याचे आव्हान पालिकेसमोर निर्माण झाले आहे.

मुंबईत नियंत्रणात आलेली कोरोना रुग्णांची संख्या आता वाढत असून 12 सप्टेंबरपर्यंत एकूण रुग्णसंख्या 1,67,608 झाली आहे. तर मृतांचा आकडा 8106 झाला आहे. आतापर्यंत 1,30,016 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून 29,131 सक्रिय रुग्ण आहेत. मात्र सुमारे एक हजार नोंद होणारी रुग्णसंख्या ऑगस्टअखेरीस पुन्हा वाढायला सुरुवात झाली असून गेल्या आठवडाभरात दररोज सुमारे दोन हजार रुग्ण आढळत आहेत. विशेष म्हणजे सुरुवातीला झोपडपट्टय़ा-चाळींमध्ये वाढणारा कोरोना आता मात्र इमारतींमध्ये जास्त वाढत आहे. गणेशोत्सवात वाढलेल्या गाठीभेटी, लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर नागरिकांचा वाढलेला बेजबाबदारपणा रुग्णसंख्या वाढण्यास कारणीभूत असून कोरोना चाचण्यांचीही संख्या वाढल्यामुळेही जास्त रुग्ण नोंद होत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, रुग्ण वाढत असले तरी मुंबईतील स्थिती नियंत्रणात आहे. पालिकेची आरोग्य यंत्रणा रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यास सक्षम असल्याचा विश्वास व्यक्त करतानाच मुंबईकरांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहनही पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

विनामास्क फिरणाऱयांवर कारवाईसाठी 500 फिल्ड ऑफिसर
– कोरोना रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क वापरणे बंधनकारक आणि महत्त्वाचे आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी तोंडावर मास्क न लावता फिरणाऱयांवर कारवाई करण्यासाठी पालिका 24 विभागांत मिळून 500 फिल्ड ऑफिसर तैनात ठेवणार आहे. याशिवाय लवकरच या कारवाईसाठी मार्शलही नेमणार आहे.

– मास्कशिवाय फिरताना आढळल्यास 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, मागील पाच महिन्यांत ‘मास्क’ न लावता सार्वजनिक ठिकाणी आढळून आलेल्या 2 हजार 798 नागरिकांकडून एक हजार रुपयांप्रमाणे 27 लाख 48 हजार 700 एवढा दंड पालिकेकडून वसूल करण्यात आला आहे.

मे महिन्यापासून कंटेन्मेंट झोनची स्थिती
– मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात मुंबईत 3097 इमारती सील तर 696 कंटेन्मेंट झोन होते, परंतु 3 जूनपासून लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने खुले करण्यास सुरुवात झाल्यानंतर प्रतिबंधित क्षेत्रांच्या आकडेवारीत वाढ झाली.
– जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात 798 प्रतिबंधित क्षेत्र, तर 4538 इमारती सील कराव्या लागल्या. 9 जुलै रोजी 751 कंटेन्मेंट झोन तर 6597 सील इमारती होत्या. मात्र 18 जुलै रोजी मुंबईत स्थिती आणखी सुधारल्याने हा आकडा प्रतिबंधित क्षेत्र 708 आणि सील इमारतींची संख्या 6235 पर्यंत खाली आली.
– 2 ऑगस्ट रोजी 617 कंटेन्मेंट झोन तर 5519 इमारती-इमारतींचे भाग सील होते, मात्र ऑगस्टअखेरीस रुग्णसंख्या वाढू लागल्याने इमारतींमधील प्रतिबंधित क्षेत्रात वाढ होत आहे. 1 सप्टेंबर रोजी सीलबंद इमारती – 6293 तर चाळी-झोपडपट्टय़ांची संख्या – 577 होती. तर 12 सप्टेंबर रोजी सीलबंद इमारती – 7680 तर सीलबंद चाळी-झोपडपट्टी – 557 झाल्या आहेत.

मी पोलीस… मी रक्षणकर्ता
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, लॉकडाऊन असलेली मुंबई आता हळूहळू टप्प्याटप्प्याने अनलॉक होऊ लागली आहे. मुंबईकर ठराविक वेळेत उद्यान आणि चौपाटय़ांवर भटकू लागले आहेत. रविवार असल्यामुळे मुंबईकरांनी आपला मोर्चा मरीन ड्राईव्हकडे वळवला होता. अशा वेळी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱयांना मुंबई पोलीस आपल्या भाषेत चांगलीच ‘समज’ देत होते.