
मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांची सभा कोरोना साथीच्या प्रदीर्घ कालावधीमुळे शासनाचे नियम पाळून नुकतीच घेण्यात आली. अध्यक्ष भाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष मनोहर इंदुलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत आधुनिक तंत्रज्ञानाचा कबड्डी या खेळात कसा वापर करता येईल या विषयावर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.
कोरोनामुळे सर्व जगाचीच अपरिमित हानी झाली. त्यात सर्व खेळांबरोबर कबड्डीचेही नुकसान झाले. यातून मार्ग काढण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्याचा विचार पुढे आला. यापुढे मुंबई शहर कबड्डी संघटनेला संलग्न असणाऱया सर्व संघांची (व्यावसायिक व स्थानिक) व खेळाडूंची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करण्याचे एकमताने ठरविण्यात आले. सर्व संलग्न संस्थांना ऑनलाइन नोंदणी करताना संस्थेचे नाव, पत्रव्यवहाराचा पत्ता, ईमेल आयडी, अध्यक्ष व सचिव यांची नावे तसेच यांचे आधारकार्ड व पॅनकार्ड, सोबत भ्रमणध्वनी क्रमांक, संस्थेचे जी. एस. टी. क्रमांक व पॅन कार्ड मागविण्यात येत आहे.
या आशयाचे परिपत्रक मुंबई शहर कबड्डी असोसिएशनशी संलग्न सर्व स्थानिक व व्यावसायिक संस्थांना पाठविण्यात येणार आहे, जेणेकरून त्यांच्या वेळेची बचत होईल आणि कार्यप्रणालीत नीटनेटकेपणा व सुसूत्रता येईल. तसेच या खेळातील अनिष्ठ प्रकारांवरदेखील निर्बंध येतील. या खेळात पारदर्शकता येण्यासाठी मुंबई शहर संघटनेने हे पाऊल उचलले आहे. तरी संलग्न संस्थांनी आपले माहिती पत्रक संघटनेच्या कार्यालयातून त्वरित घेऊन जावे किंवा विभागीय सदस्यांशी संपर्क साधून अधिक माहिती जाणून घेऊन लवकरात लवकर सर्व माहिती ऑनलाइन भरून द्यावी, असे आवाहन जिल्हा संघटनेचे सचिव विश्वास मोरे यांनी या पत्रकाद्वारे केली आहे.




























































