टीसी अंतर राखूनच तिकीट तपासणार; रेल्वे सीसीटीव्हीद्वारे जमावावर लक्ष ठेवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकारने जमावबंदी लागू केली असताना आता रेल्वे स्थानकांवरही अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी थेट सीसीटीव्ही यंत्रणेची मदत घेतली जाणार आहे. तसेच रेल्वेच्या तिकीट तपासनीसांना आता प्रवाशांचे तिकीट तपासताना ठराविक अंतर राखूनच तिकिटांची तपासणी करण्याचे आदेश रेल्वेने काढले आहेत. तसेच रेल्वे परिसरात घाण करणाऱया तसेच जागोजागी थुंकणाऱयांविरोधातदेखील कठोर मोहीम राबवली जात आहे.

कोरोनाच्या धास्तीने रेल्वेने स्वच्छताविषयक उपाययोजना तर राबवण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे लोकल आणि मेल-एक्सप्रेसच्या डब्यांमध्ये निर्जंतुकीकरणाची मोहीम सुरू असतानाच लांब पल्ल्याच्या ट्रेनमधील पडदे आणि ब्लँकेट काढून टाकण्यात येत आहेत. तसेच प्रवाशांनाच त्यांचे ब्लँकेट आणण्यास रेल्वेने फर्मावले असतानाच आता रेल्वेने जमावबंदीच्या आदेशाचे पालन करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आता रेल्वे स्थानकांवर अचानक गर्दी आढळल्यास त्यावरही सीसीटीव्हींद्वारे निगरानी ठेवली जाणार आहे. अशा जमावाची लागलीच चौकशी केली जाणार आहे. तसेच ट्रेन आणि स्थानक परिसरात कचरा करणाऱयांवर तसेच थुंकणाऱयांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

दहा दिवसांत 13,900 रुपयांचा दंड

1 ते 10 मार्च दरम्यान रेल्वे परिसरात कचरा टाकणारे तसेच जागोजागी थुंकण्याच्या प्रकरणात 138 तक्रारी दाखल होऊन त्यांच्याकडून 13,900 रुपयांचा दंड वसूल केला आहे. फेब्रुवारी 2020मध्ये अशा 140 प्रकरणांत आरोपींकडून 24,400 रुपयांचा दंड मध्य रेल्वेने वसूल केला असल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी स्पष्ट केले.