Mumbai crime news रुग्णवाहिका, खासगी गाड्या अन् इराणी टोळीतील सोनसाखळी चोराला फिल्मी स्टाईलने अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तब्बल 27 गुन्हे दाखल असलेल्या इराणी टोळीतील सोनसाखळी चोराला पोलिसांनी फिल्मी स्टाईलने अटक केली आहे. मोहम्मद संगा उर्फ झाकीर फरजत सय्यद (26) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या हातालाही फ्रॅक्चर झाले आहे. पोलीस उपनिरीक्षक संदीप बाळासाहेब साळवे असे फ्रॅक्चर झालेल्या पोलिसांचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2022 ते जानेवारी 2023 दरम्यान मुंबईतील बोरिवली पश्चिम भागामध्ये एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन ठिकाणी सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या. इराणी टोळीतील सदस्यांनी ही चोरी केल्याचे पोलीस चौकशीमध्ये उघड झाले होते. त्यानंतर या चोराला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला.

सदर आरोपी फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास इराणी वस्तीच्या बाजूला चहा टपरीवर येणार असल्याची माहिती खबऱ्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यकांत पवार यांना दिली. आंबिवली येथील ही वस्ती चोरींची वस्ती म्हणून प्रसिद्ध असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन सोनसाखळी चोरी, फसवणूक, घरफोडी असे गुन्हे करणारे गुन्हेगार येथे राहतात. त्यामुळे येथे जाऊन आरोपीला ताब्यात घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.

आरोपीला पकडण्यासाठी बोरिवली पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मस्के व पथक, चारकोप पोलीस ठाण्याचे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक भुषण ठोके व पथक, मालाड पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी शिंदे व पथक आणि एम एच बी कॉलनी पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यकांत पवार, पोलीस उपनिरीक्षक अखिलेश बोंबे, पोलीस उपनिरीक्षक संदीप साळवे, पोलीस हवालदार नंदकिशोर तावडे, पोलीस हवालदार अनिल शिंदे, पोलीस हवालदार प्रवीण जोपळे, पोलीस हवालदार संदीप परीट, पोलीस नाईक सतीश देवकर, पोलीस शिपाई अर्जुन आहेर,पोलीस शिपाई महेंतश सवळी, पोलीस शिपाई योगेश मोरे, महिला पोलीस शिपाई पुजारी तसेच 2 रुग्णवाहिका चालक, 3 कांदिवली पोलीस मित्र असे एकूण 26 जणांची टीम बनवण्यात आली.

आंबिवली गावात जाण्यासाठीसाठी रुग्णवाहिका आणि खासगी गाड्यांचा वापर करण्याचे आणि गावाच्या बाहेर पोहोचल्यावर टीमची तीन भागात विभागणी करण्याचे ठऱले. पोलिसंनी आरोपीला फिल्मी स्टाईलने सापळा रचून अटक केली. मात्र आरोपीला अटक करताना इराणी वाडीतील महिलांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. दगडफेकीत काही पोलिसांनाही दुखापत झाली. मात्र, पोलिसांनी जीव धोक्यात घालून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीविरोधात महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये 27 गुन्ह्यांची नोद असून 2021मध्ये तो जामिनावर बाहेर आला होता.