
पवईच्या शिवशक्ती नगरात असलेल्या ‘घुंगट’ या साडीच्या दुकानात भरदिवसा लुटमार करणाऱया चौकडीला पवई पोलिसांनी गजाआड केले आहे. कोणताही पुरावा नसताना केवळ तांत्रिक बाबींच्या आधारे पवई पोलिसांनी ही कारवाई केली.
21 एप्रिलच्या भरदुपारी घुंगट या साडीचा दुकानात चौघेजण घुसले. त्यांनी चाकूचा धाक दाखवत तसेच एकाच्या पोटात चाकू घुसवून लुटमार केली होती. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अबुराव सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने कसून तपास सुरू केला. पोलिसांनी पवईपासून गोवंडीपर्यंतचे सर्व सीसीटीव्ही तपासले. आरोपी ओला कारने आले होते आणि रिक्षाने निघून गेले होते. ही बाब निष्पन्न होताच आरोपींनी ओला कार बुक करण्यासाठी वापरलेल्या मोबाईल नंबरवरून आरोपी विरार येथील राहणारे असल्याचे शोधून काढले. मग पोलिसांनी विरार गाठून घुंगट या साडीच्या दुकानात लुटमार करणाऱया चौघांना अटक करून आणले.
























































