मुंबईकरांना दिलासा; जानेवारीपर्यंतचा जलसाठा जमा, धरणे अर्धी भरली, पाणीकपात टळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे 11 जुलै रोजी सातही धरणांत सद्यस्थितीत 721278 दशलक्ष लिटर जलसाठा जमा झाला आहे. मुंबईला होणारा दररोजचा 4100 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा पाहता हे पाणी पुढील जानेवारीपर्यंत पुरणारे आहे. एपूण पुरवठय़ाच्या हा जलसाठा अर्धा पूर्ण झाला आहे. त्यामुळे मुंबईतील 10 टक्के पाणीकपात लवकरच रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज 4,100 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. मात्र गेल्या काही दिवसांत धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने तलाव वेगाने भरली आहेत. तुळशी आणि विहार तलाव याआधीच ओव्हरफ्लो झाले आहेत.

सध्याचा जलसाठा

(दशलक्ष लिटर)
अप्पर वैतरणा – 63569
मोडक सागर – 106492
तानसा – 113989
मध्य वैतरणा – 84200
भातसा – 317284
विहार – 27698
तुळशी- 8046

गेल्या तीन वर्षांतील 11 जुलैचा जलसाठा
2026 – 721278 दशलक्ष लिटर – 49.83 टक्के
2025 – 1069357 दशलक्ष लि. – 73.88 टक्के
2024 – 322143 दशलक्ष लिटर – 22.26 टक्के