
सामना प्रतिनिधी। मुंबई
महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीमधील वीज कामगारांसाठी सुरू केलेली मेडिक्लेम पॉलिसी त्यांच्या आईवडिलांसाठी वरदान ठरली आहे. वर्षभरात वीज कामगारांच्या 13 हजार 316 आईवडिलांनी तब्बल 57 कोटी रुपयांचे मेडिक्लेम पॉलिसींतर्गत घेतले आहेत. अनेकदा पन्नाशीनंतर उतरत्या वयात प्रकृतीच्या कुरबुरी वाढत असतानाच मुलांकडून आईवडिलांकडे दुर्लक्ष होत असताना या मेडिक्लेममुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य सरकारची मालकी असलेल्या तिन्ही वीज कंपन्यांमध्ये सुमारे 86 हजार कामगार कार्यरत असून त्यांना मेडिक्लेमचे कवच मिळावे म्हणून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या सहकार्याने मेडिक्लेम पॉलिसी सुरू केली आहे. 125 कोटी रुपयांच्या मेडिक्लेमांतर्गत वीज कामगारांबरोबरच त्यांचे आईवडील, पत्नी, मुले अशा पाच जणांना लाभ मिळतो. त्यानुसार फेब्रुवारी 2018 पासून वर्षभरात एकूण 36 हजार जणांनी मेडिक्लेम पॉलिसीअंतर्गत उपचार घेतले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक 8 हजार 908 कर्मचाऱयांनी उपचार घेतले आहेत, तर कामगारांच्या 5800 आई आणि 7516 वडिलांनी मोफत उपचार घेतले आहेत. या मेडिक्लेम पॉलिसींमध्ये आर्थोपेडिकची सर्व शस्त्रक्रिया, हर्निया, लिव्हर ट्रान्सप्लांट, कॅन्सर, हृदय शस्त्रक्रिया, डेंग्यू, मलेरिया अशा सर्वच आजारावर उपचार केले जातात.
सवाशे कोटीत पावणेदोनशे कोटींचे उपचार
तिन्ही वीज कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱयांसाठी तब्बल 125 कोटी रुपये खर्चून ओरिएंटल इन्शुरन्सकडून वर्षभरापासून मोडिक्लेम पॉलिसी घेतली आहे. त्यानुसार 36 हजार कामगार आणि त्यांच्या अवलंबितांनी राज्यातील वेगवेगळय़ा रुग्णालयांमध्ये तब्बल 176 कोटी 56 लाख रुपयांचे उपचार घेतले आहेत. दरम्यान, या मेडिक्लेम पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी कामगारांना वर्षाला सहा हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे व्यवस्थापनाने नवीन वेतन करार करताना कर्मचाऱयांवर पडणारा हा आर्थिक भार उचलावा अशी मागणी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी केली आहे.
किती जणांनी किती उपचार घेतले रक्कम
कामगार 8908 48.19 कोटी
पत्नी 4768 20.38 कोटी
मुली 2006 5 कोटी
मुले 3348 8.33 कोटी
आई 5800 33.34 कोटी
वडील 7516 36.79 कोटी
























































