मुंबई-गोवा महामार्ग खड्यात; सरकारविरोधात जनआक्रोश

शेकडो कोटी रुपयांचा चुराडा करूनही खड्यात गेलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम अद्यापही लटकले असून त्यामुळे रोजच अपघातात निष्पाप प्रवाशांचे बळी जात आहेत. मात्र सरकार नेहमीच नवनवीन वायदे करून वेळ मारून नेत असल्याने संतप्त रायगडकरांनी आज जोरदार आंदोलन केले. माणगावमध्ये सरकारविरोधात जनआक्रोश करीत नागरिकांनी रस्ता रोको केल्याने काही काळ वाहतूककोंडी झाली. त्यानंतर उपोषणाला बसलेल्या आंदोलकांनी आता बाता नको.चौपदरीकरण पूर्ण होणार कधी ते आधी सांगा मगच माघार घेऊ, असा इशाराच सरकारला दिला आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या झालेल्या दुरवस्थेला सरकारची निष्क्रियेताच जबाबदार असल्याचा आरोप करत जनआक्रोश समितीने आजपासून आंदोलन सुरू केले आहे. माणगावमध्ये समितीच्या वतीने निषेध रॅली काढण्यात आली. यामध्ये माणगावसह कोकणातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. महामार्गावर निघालेल्या रॅलीमध्ये सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत महामार्ग रोखून धरण्यात आल्याने काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनंतर महामार्गावरील आंदोलन स्थगित करत नियोजित जागेवर आमरण उपोषण सुरू करण्यात आले.

तर नवीन मार्ग होऊ देणार नाही

गणेशोत्सव आणि शिमगा हे कोकणवासीयांचे प्रमुख सण आहेत. या सणाला कोकणी माणूस यायला निघाला की सरकार सल्ला देते पुणे-कोल्हापूर मार्गे कोकणात जा. असा प्रवास करण्याचा आता कंटाळा आला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होत नाही तोपर्यंत कोकणासाठी घोषणा होत असलेल्या एकही नवीन महामार्ग होऊ देणार नाही असा इशारा संजय यादवराव यांनी दिला आहे.

रस्ता रोखून धरल्याने वाहतूककोंडी
■ संजय यादवराव, रूपेश दर्गे, अजय यादव, संजय जंगम, पराग लाड, सुरेंद्र पवार, प्रशिल लाड, आशिष बने, अनिल जोशी यांनी या आंदोलनाची हाक दिली होती.

• माणगावचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, रिक्षाचालक-मालक संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब साबळे, उद्योजक शेखर गोडबोले यांनी पाठिंबा व्यक्त केला.

लाडके भाऊ रस्त्यावर मरताहेत ते आधी बघा
राज्यातील लाडक्या बहिणींना मदत करायचे सोंग खोके सरकार करीत आहे, पण त्याच लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ मुंबई-गोवा महामार्गावर रस्ते अपघातात मरत आहेत. याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही, असा संताप माणगावचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांनी उपस्थित केली.

आधी मुख्यमंत्र्यांनी लेखी द्यावे
महामार्ग केव्हा पूर्ण होईल याबाबत मुख्यमंत्र्यांकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. महामार्गाच्या दुरवस्थेमुळे झालेल्या अपघातात जे मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कसलेही आर्थिक सहाय्य केले जात नाही. कोकणातील नागरिकांची उपजीविका पर्यटनावर अवलंबून आहे मात्र रस्ता खराब असल्याने पर्यटकांनी कोकणाकडे पाठ फिरवली आहे त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला असल्याने त्याची नुकसानभरपाई राज्य सरकारने करून द्यावी यासह विविध चौदा मुख्य मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.