
पावसाळा तोंडावर आला असताना मुंबईकरांसाठी ‘डेंग्यू, मलेरियाचा रेड अलर्ट’ मिळाला आहे. कारण पालिकेने गेल्या पाच महित्यांत घरोघरी जाऊन केलेल्या डेंग्यू, मलेरिया अळ्या आणि डासांच्या शोध मोहिमेत तब्बल 37 हजार 800 ठिकाणी डेंग्यूला कारणीभूत ठरणारा एडीस इजिप्ती तर 4 हजार 529 ठिकाणी मलेरिया पसरवणारा एनाफिलीस डास आढळला आहे. पालिकेने राबवलेल्या या विशेष मोहिमेत 32 लाख 51 हजार 623 घरांची तपासणी करण्यात आली.
मुंबईत डेंग्यू, मलेरियाला आळा घालण्यासाठी धूम्रफवारणी, कीटकनाशक फवारणी मोहीम वर्षभर राबवली जाते. मात्र पाणी साचून राहणे, अस्वच्छता यामुळे डेंग्यू, मलेरियाच्या डासांसाठी उत्पत्ती स्थाने मिळतात. या पार्श्वभूमीवर पालिकेने जानेवारी ते 27 मे 2026 या कालावधीत महानगरपालिकेच्या सर्व 26 प्रशासकीय विभागांमध्ये मिळून एकूण 22 हजार 80 परिसरांना भेटी दिल्या असून 32 लाख 51 हजार 623 घरांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 30 लाख 17 हजार 220 घरांच्या परिसरात धूम्रफवारणी करण्यात आली आहे. पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या सूचानांनुसार डेंग्यू, मलेरिया रोखण्यासाठी मोहीम राबवली जात आहे. आयुक्त स्वतः कीटकनाशक चौक्यांना भेटी देऊन कामाचा आढावा घेत आहेत. कर्मचाऱयांच्या समस्या जाणून घेत आहेत.
असे होतेय काम
कीटकनाशक विभागाकडून घरोघरी जाऊन पाहणी
कीटकनाशक खात्याचे एक हजार कर्मचारी तैनात
डेंग्यू, मलेरियाची उत्पत्तीस्थाने नष्ट करणे
धूम्रफवारणी, कीटकनाशक फवारणी करणे
पाण्याच्या टाक्या, पिंप, प्लॅस्टिक ताडपत्र्यांची तपासणी
शोभेच्या वस्तू, करवंटयांत साचलेले पाणी तपासणे
1 लाखांवर अडगळीच्या वस्तू नष्ट
या मोहिमेत डेंग्यू, मलेरियाची उत्पत्तीस्थाने असलेले 540 टायर्स आणि 1 लाख 16 हजार 251 अडगळीतील वस्तू नष्ट करण्यात आल्या आहेत. तसेच पालिका क्षेत्रात सुरू असणाऱया चार हजार इमारत पुनर्विकास प्रकल्पांच्या ठिकाणी सुरक्षा अधिकारी यांना डास प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.






























































