
मुंबई शहर आणि उपनगरांत ऑक्टोबर हीटचे चटके बसू लागले आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवडय़ात तापमान 35 अंशांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. सोमवारी सांताक्रुझ व कुलाबा या दोन्ही केंद्रांवर सरासरीपेक्षा अधिक तापमान नोंद झाले. या तापमानवाढीमुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही झाली. तापमानात आणखी वाढ होईल आणि पारा 36 अंशांवर पोहोचेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
गेल्या आठवडय़ात मान्सून माघारी परतला आणि मुंबईसह राज्यभरात उष्णतेच्या तीव्र झळा सुरू झाल्या आहेत. राज्याच्या अनेक भागांत तापमान 37 अंशांच्या पुढे जाऊ लागले आहे. मुंबईचे तापमान सलग तीन दिवस सरासरीपेक्षा अधिक नोंद झाले. सोमवारी सांताक्रुझमध्ये कमाल तापमानाने 35 अंशांची विक्रमी पातळी गाठली. हे तापमान सरासरीपेक्षा तीन अंशांनी अधिक होते, तर किमान तापमान 24.2 अंश इतके नोंदवण्यात आले. कुलाब्यात किमान तापमान 27 अंशांच्या घरात गेले होते. त्यामुळे मुंबईकर उकाडय़ाने हैराण झाले. पुढील आठवडाभरात मुंबईचे तापमान 35 ते 36 अंशांच्या आसपास राहील, तसेच आकाश प्रामुख्याने निरभ्र राहील आणि हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवेच्या गुणवत्तेत घसरण
सप्टेंबर महिन्यात मुंबईतील हवेची गुणवत्ता तुलनेने चांगली होती. अनेक दिवस हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 50 अंकांच्या खाली होता. मात्र ऑक्टोबरची सुरुवात होताच उष्णता आणि प्रदूषणात वाढ झाली आहे. हवेच्या गुणवत्तेत घसरण झाल्यामुळे दमा व इतर श्वसनविकारांचा त्रास असलेल्या नागरिकांची दमछाक होत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ‘समीर’ ऍपवरील नोंदीनुसार, सोमवारी मुंबईचा एक्यूआय 89 इतका नोंदवला गेला.
संपूर्ण कोकण पट्टय़ाला उष्णतेचा ‘यलो अलर्ट’
मुंबई आणि ठाण्याबरोबरच संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात पुढील आठवडाभरात उष्णतेत मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत. हवामान खात्याने मुंबई-ठाण्यासह पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.



























































