पावसाळी आजारांची धास्ती; दीड हजार बेड तैनात ठेवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाची तिसरी लाटही यशस्वीपणे परतवून लावल्यानंतर आता पालिकेने पावसाळी आजार रोखण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. यामध्ये गेल्या काही वर्षांत पावसाळ्यात नोंद होणाऱया रुग्णांच्या संख्येनुसार यावर्षी दीड हजार बेड तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दूषित पाण्यापासून होणारे आणि किटकजन्य आजाराच्या रुग्णांसाठी प्रमुख रुग्णालये, मेडिकल कॉलेज आणि उपनगरीय रुग्णांलयांमध्ये या बेडची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

मुंबई महानगरपालिकेची ‘केईएम’, नायर, शीव आणि कूपर अशी मोठी रुग्णालये आहेत. शिवाय कस्तुरबा विशेष विषाणू रुग्णालयासह 16 उपनगरीय रुग्णालये, प्रसूतीगृहे, दवाखाने आहेत. या ठिकाणी पालिकेच्या माध्यमातून मोफत उपचार मिळतात. पालिकेच्या सर्व रुग्णालयांत एकूण 12 हजार बेड आहेत. यामध्ये व्हेंटिलेटर्स, आयसीयू बेडचाही समावेश आहे. पालिकेच्या रुग्णालयात महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱयातून गोरगरीब रुग्ण उपचारांसाठी दाखल होत असतात. पावसाळ्यात प्रदूषित पाण्यापासून होणारे आणि किटकजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने नियोजन केले आहे. सद्यस्थितीत दीड हजार बेडचे नियोजन केले असून गरज भासल्यास बेड वाजवण्यात येतील, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य खात्याकडून देण्यात आली.

दररोज ‘फीडबॅक’ घेणार

महिनाभरापूर्वी पालिका प्रशासनाने घेतलेल्या बैठकीमध्ये एका महिन्यात डास उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले होते. यानुसार आस्थापनांनी कार्यवाही केली असल्याचे स्पष्ट करण्यात आली आहे. तर कार्यवाही शिल्लक असणाऱयांना एका आठवडय़ात कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तर पावसाळ्यात कंट्रोल रूमच्या माध्यमातून पावसाळी आजारांचा आढावा दररोज घेण्यात येणार असून कार्यवाही करण्यात येणार आहे. या शिवाय पावसाळी आजार रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात येणार आहे. रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱयांकडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई केली जाणार आहे.

साचणारे-प्रदूषित पाणी, किटकांचा धोका

पावसाळ्यात पाणी साचून राहत असल्यामुळे किटकांचा प्रादुर्भाव वाढतो. शिवाय दूषित पाण्यामुळेही आजार होतात. यामध्ये दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफाइड, कॉलरा, जाँडीस असे आजार होतात. तर कीटकांच्या प्रभावामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया असे आजार होतात.