
भारतीय रेल्वेवर लवकरच प्रवासी सुरक्षा आणि रेल्वेच्या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी ‘कोरस कमांडो’ येणार आहेत. रेल्वे परिसरातील दहशतवाद आणि नक्षलवादी कारवाया हाणून पाडण्यासाठी आरपीएफच्या नाईन्थ बटालियनला खास प्रशिक्षण देण्यात येत आहे. अशा एक हजार कमांडोंचे प्रशिक्षण सुरू असून त्यापैकी काही कमांडो मध्य आणि पश्चिम रेल्वेवर दाखल होणार आहेत.
कमांडो फॉर रेल्वे सिक्युरिटी अर्थात ‘कोरस’ या नावाने रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी नुकतीच या नव्या कमांडो पथकाची घोषणा केली होती. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाकडे सध्या असलेल्या क्विक रिस्पॉन्स टीम अर्थात ‘क्यूआरटी’ पथकाची जागा हे नवे कोरस कमांडो घेणार आहेत. या कमांडोंना खडतर प्रशिक्षण देण्यात येत असून त्यांना सर्व प्रकारचे दहशतवादी हल्ले आणि नक्षली हल्ले परतवून लावण्याचे धडे देण्यात येत आहेत.
भारतीय रेल्वे आणि तिच्या वापरकर्ते यांच्या चोख सुरक्षेसाठी ही खास कोरस कमांडोंची टीम काम करणार असून या पथकात निवड होण्यासाठी सर्वोच्च फिजिकल फिटनेस असलेल्या सरासरी 30 ते 35 वयोगटाच्या आतील तरुणांचीच निवड होणार आहे. रेल्वेचा जो परिसर नक्षलवाद्यांच्या आणि दहशवाद्यांच्या निशाण्यावर आहे अशा परिसरात या कमांडोंची डय़ुटी लागणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
एक हजार कमांडेंना हरयाणा येथे प्रशिक्षण दिले जात आहे. हे कमांडो ‘कोरस’ नावाने ओळखले जाणार आहेत. या कमांडोंना रेल्वे परिसरात घडणाऱया कोणत्याही मानवी अथवा नैसर्गिक संकटांचा सामना करण्यासाठी खास प्रशिक्षण देण्यात येत आहे. – अशरफ के. के. (विभागीय सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे आरपीएफ)






























































