ज्यांच्या घरात सीलिंगची माती पडली त्यांनी घरे रिकामी केली

69

सामना प्रतिनिधी । मुंबई

सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास इमारतीत राहणाऱया काही खोल्यांमध्ये सीलिंगची माती पडू लागल्याचे रहिवाशांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी कोणताही विचार न करता तत्काळ घर रिकामे केले आणि त्याचवेळी नातेवाईकांकडे आसरा घ्यायला गेले. पण ज्यांच्या घरात माती पडण्याचा प्रकार घडला नाही ते गाफील राहिले आणि शेवटी सकाळी 11.30 च्या सुमारास घात झाला. इमारत पत्त्यासारखी खाली कोसळली. मुळात इमारत जर्जर झाली होती.

डोंगरीच्या निशानपाडा क्रॉस लेन येथील केसरबाई इमारत सोमवारी पत्त्यासारखी कोसळल्यानंतर अनधिकृत इमारतींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मूळ ढाच्यात केलेले बदल आणि त्याकडे शासनाच्या संबंधित विभागाकडून झालेला कानाडोळा या घटनेला जबाबदार असल्याचा आरोपी परिसरातील नागरिक करीत आहेत.

पालिका, म्हाडाकडून इमारत खाली करण्याची नोटीसदेखील बजावण्यात आली होती, परंतु रहिवाशांनी त्याची वेळीच दखल घेतली नाही. परिणामी आज हे संकट ओढावले असे ही परिसरातील नागरिकांनी सांगितले.

वीज, पाणी मिळतेच कसे?
डोंगरी, पायधुनी परिसरात सर्वाधिक बांधकामे ही अनधिकृत आहेत. शनिवार-रविवार बघून येथे बांधकामे केली जातात. 10-15 दिवसांत इमारत उभी केली जाते. कोणाला काही न सांगता सर्रास बांधकामे केली जातात. विशेष म्हणजे अशा इमारतींना पाणी आणि वीजदेखील पुरविली जाते हे सगळे होते कसे, यावर वेळीच कारवाई का होत नाही, असा संतप्त सवालदेखील नागरिकांमधून केला जात आहे.

...तर कोर्टात धाव घेतात
आमची सदैव गस्त सुरूच असते. बऱयाचदा बेकायदा बांधकामे सुरू असल्याचे निदर्शनास पडल्यास आम्ही त्यास अटकाव करतो. पण संबंधित बांधकाम करणारे मग कोर्टात धाव घेतात. परिणामी आम्हाला हात आकडता घ्यावा लागतो. जर पालिका किंवा म्हाडाच्या अधिकाऱयांनी वेळीच हस्तक्षेप करून कारवाई केल्यास सर्व काही ठीक होईल, असे एका पोलीस अधिकाऱयाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

ढिगाऱयाचा नमुना प्रयोगशाळेत पाठवणार
मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत एनडीआरएफ, अग्निशमन दल व पोलीस ढिगारा उपसण्याचे काम करीत होते. घटनास्थळावरून काढलेल्या ढिगाऱयातील नमुना एनडीआरएफने काढून आमच्याकडे दिला आहे. तो नमुना तपासणीसाठी आम्ही प्रयोगशाळेत पाठविणार आहोत, असे डोंगरी पोलिसांकडून सांगण्यात आले.

पालिका, म्हाडाला पत्र
डोंगरी पोलिसांचे एक पथक केसरबाई इमारत दुर्घटनेची चौकशी करीत आहे. त्याचाच भाग म्हणून पालिका आणि म्हाडाच्या संबंधित विभागांना आम्ही पत्र लिहिले आहे. तुमचे पथक डोंगरी भागात गस्त घालते का, परिसरात अनधिकृत बांधकाम सुरू असेल तर यापूर्वी काही कारवाई केली आहे का, बेकायदेशीर कारवायांना अटकाव केला आहे का, शिवाय दुर्घटनाग्रस्त इमारतीसंबंधी काय भूमिका घेण्यात आली होती याची माहिती देण्यास त्या यंत्रंणांना पत्राद्वारे सांगितल्याचेही एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱयाने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या