कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांचा महावितरणला ठेंगा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी कारवाई म्हणून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांनी महावितरणला ठेंगा दाखवला आहे. महावितरणने आतापर्यंत वीज बिल न भरणाऱया 35 लाखांहून अधिक ग्राहकांचे कनेक्शन कापले आहे. त्यामुळे वीज बिलाची वसुली होणे अपेक्षित होते. मात्र तसे न होता, संबंधितांनी बिल तर भरलेच नाही, मात्र महावितरणलाच चकवा देत विविध मार्गांनी वीज वापरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या या ग्राहकांकडे असलेली सुमारे नऊ हजार कोटी रुपयांची थकबाकी कशी वसूल करायची, असा प्रश्न उभा राहिला आहे.

राज्याच्या कानाकोपऱयातील ग्राहकांना महावितरण वीजपुरवठा करते. त्यानुसार त्यांनी वापरलेल्या विजेचे बिल प्रत्येक महिन्याला संबंधित ग्राहकाला पाठवले जाते. मात्र अनेक ग्राहक वीज बिल भरण्यास टाळाटाळ करत असल्याने गेल्या दहा वर्षांत महावितरणने 35 लाखांहून अधिक ग्राहकांचे वीज कनेक्शन कायमस्वरूपी खंडित केले आहे. त्यांच्याकडे जवळपास आठ हजार 788 कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्याच्या वसुलीसाठी महावितरणने वेळोवेळी प्रोत्साहन योजना राबवली, मात्र त्यालाही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. वीजपुरवठा खंडित केलेल्या दोन लाख ग्राहकांच्या सध्याच्या वीजवापराबाबत महावितरणने नुकताच आढावा घेतला. त्यामध्ये 18 हजार 939 ग्राहक बेकायदेशीरपणे वीज वापरत असल्याचे निदर्शनास आले, तर 9 हजार 868 ग्राहक दुसऱया कनेक्शनच्या माध्यमातून वीज वापरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे थकीत बिलाच्या वसुलीसाठी महावितरणने केलेली कायमस्वरूपी वीजपुरवठय़ाची कारवाई फोल ठरल्याची माहिती महावितरणच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.

विभाग थकबाकी

  • विदर्भ 790 कोटी
  • मराठवाडा 1898 कोटी
  • कोकण 1526 कोटी
  • उर्वरित महाराष्ट्र 4 हजार 573 कोटी

वर्षाला सुमारे पाचशे-सहाशे कोटींची भर

वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांकडे जवळपास आठ हजार 788 कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्याच्या व्याजापोटी वर्षाला बिलाच्या मूळ रकमेत पाचशे-सहाशे कोटी रुपयांची भर पडत आहे. दरम्यान, महवितरणने थकीत रकमेच्या वसुलीसाठी विविध योजना राबवल्या; मात्र त्यालाही अल्प प्रतिसाद मिळाला आहे.