
देशातील सर्वात जुन्या दंत महाविद्यालयांमध्ये दुस-या क्रमांकाचे रुग्णालय असा नावलौकिक असणा-या आणि दरवर्षी तब्बल साडेतीन लाखांपेक्षा अधिक रुग्णांवर परिणामकारक दंतोपचार करणा-या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर दंत महाविद्यालयाच्या शैक्षणिक व सोयी-सुविधा विषयक कामगिरीची दखल एकाचवर्षी म्हणजेच वर्ष 2020 मध्ये 3 राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणांमध्ये घेण्यात आली आहे. या अंतर्गत ‘द वीक’ या नियतकालिकाने देशभरातील सर्वोत्कृष्ट दंत महाविद्यालयांमध्ये 5 वे स्थान दिले आहे. तर ‘आऊटलुक’ साप्ताहिकाने देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील दंत महाविद्यालयांमध्ये 3 रे स्थान देत या महाविद्यालयाचा गुणगौरव केला आहे. तर याच महाविद्यालयाला ‘इंडिया टुडे’ साप्ताहिकाच्या पुढाकाराने करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार सहाव्या क्रमांकाचे स्थान बहाल करण्यात आले आहे. अशाप्रकारे एकाचवेळी राष्ट्रीय स्तरावरील ३ वेगवेगळ्या सर्वेक्षणांमध्ये अग्रेसर ठरल्याने नायर दंत महाविद्यालयाच्या शैक्षणिक कामगिरीसह तेथील सुविधांचा देखील राष्ट्रीय स्तरावर त्रिगुणी गौरव झाला असल्याची माहिती नायर दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम आंद्रादे यांनी दिली आहे.
अधिकाधिक नाविण्यपूर्ण व गुणवत्तेला प्राधान्य देणा-या सेवांचा नियमितपणे विस्तार करणा-या नायर दंत महाविद्यालयात एकावेळी 350 पेक्षा अधिक विद्यार्थी दंत वैद्यकीय बाबींचे शिक्षण घेत असतात. यामध्ये 5 वर्षीय पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि 3 वर्षीय पदव्युत्तर दंत वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, अशा दोन्ही अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासाठी 57 प्राध्यापक (शिक्षक) या महाविद्यालयात कार्यरत आहेत. या महाविद्यालयाची पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता वाढविण्यास नुकतीच परवानगी प्राप्त झाली असून, ती आता 60 वरुन 75 इतकी झाली आहे. तर, पदव्युत्तर प्रवेश क्षमता देखील 24 वरुन 25 इतकी झाली आहे. या दंत वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नामवंत दंत वैद्यक म्हणून सेवा देत आहेत. 24 तास ‘इमर्जन्सी डेंन्टल क्लिनिक’ संचलित करणारे देशातील हे एकमेव दंत महाविद्यालय व रुग्णालय आहे.
एकाचवेळी 3 सर्वेक्षणांमध्ये गौरव
देशभरातील शासकीय आणि खासगी क्षेत्रातील दंत महाविद्यालय व रुग्णालय यांच्या शैक्षणिक कामगिरीसह विविध स्तरीय मूल्यमापन करुन त्यातून सर्वोत्कृष्ट दंत महाविद्यालयांची निवड करण्यासाठी यंदाच्या वर्षी जी 3 वेगवेगळी सर्वेक्षणे करण्यात आली, त्यामध्ये नायर दंत महाविद्यालयाचा गुणगौरव करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्तरावर करण्यात आलेली ही सर्वेक्षणे 3 नामांकित साप्ताहिकांच्या पुढाकाराने करण्यात आली. या सर्वेक्षणासाठी देशातील दंत महाविद्यालयांची सर्वंकष माहिती, बहुस्तरीय कामगिरी, उपलब्ध पायाभूत सुविधा, शैक्षणिक सुविधा आणि त्यांची गुणवत्ता, दंत वैद्यकीय शिक्षणातील वैविध्य, संस्थेकडून आयोजित केले जाणारे उपक्रम, संशोधन, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित प्रबंध व निबंध, शिक्षण पूर्ण करुन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणा-या व्यवसायिक संधी अशा वेगवेगळ्या निकषांचा विचार करुन हे मूल्यांकन करण्यात आले.
सर्वेक्षणात 5 वे स्थान
‘द वीक’ या साप्ताहिकाच्या पुढाकाराने देशपातळीवरील सार्वजनिक व खासगी क्षेत्र मिळून विविध दंत वैद्यकीय महाविद्यालयांच्या कामगिरीचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात नायर दंत वैद्यकीय महाविद्यालयाला देशभरात 5 वा क्रमांक बहाल करण्यात आला आहे. ‘द वीक’च्या 30 ऑगस्ट 2020 च्या अंकात हे मुखपृष्ठ वृत्त प्रकाशित झाले आहे.
सर्वेक्षणात 6 वे स्थान
‘इंडिया टुडे’ या साप्ताहिकाच्या पुढाकाराने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात देशभरातील विविध सार्वजनिक व खासगी दंत महाविद्यालयांचे सर्वस्तरीय सर्वेक्षण करण्यात आले. शास्त्रीय सर्वेक्षण पद्धतींचा अवलंब करुन करण्यात आलेल्या या सर्वेक्षणामध्ये नायर दंत महाविद्यालयास देशभरातील सार्वजनिक व खासगी दंत महाविद्यालयांमधून 6 वा क्रमांक प्राप्त झाला आहे.
सर्वेक्षणात 3 रे स्थान
‘आऊटलुक’ या साप्ताहिकाच्या पुढाकाराने देशभरातील सार्वजनिक आणि खासगी अशा निवडक दंत वैद्यकीय महाविद्यालयांच्या कामगिरीचे बहुस्तरीय मूल्यमापन करण्यात आले. या सर्वेक्षणात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर दंत वैद्यकीय महाविद्यालयाने शासकीय महाविद्यालय गटामध्ये 3 रे स्थान पटकाविले आहे. ‘आऊटलुक’च्या सप्टेंबर 2020 च्या अंकात ही यादी प्रकाशित झाली आहे.
वरीलनुसार सन 2020 मध्ये 3 वेगवेगळ्या संस्थांद्वारे देशभरातील दंत महाविद्यालयांचे शास्त्रीय पद्धतीने विविध निकषांवर आधारित सर्वेक्षण करण्यात आले. या तीनही राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील नायर दंत महाविद्यालयाच्या कामगिरीवर एकापाठोपाठ-एक याप्रमाणे सलग ३ महिन्यात गौरवपूर्ण शिक्कामोर्तब करण्यात आल्याने नायर दंत महाविद्यालयाद्वारे देण्यात येणा-या सेवा व त्यांची गुणवत्ता आणि सर्वंकष कामगिरी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
महाविद्यालयाविषयी थोडक्यात महत्त्वाचे
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाची स्थापना सन 1933 मध्ये झाली. येत्या 18 डिसेंबर रोजी 87 व्या वर्षात पदार्पण करत असलेले हे रुग्णालय देशातील सर्वात जुने असे दुस-या क्रमांकाचे दंत रुग्णालय व महाविद्यालय आहे. दरवर्षी सुमारे साडेतीन लाख रुग्णांना वैद्यकीय सेवा देणा-या या रुग्णालयात 9 ‘सुपरस्पेशालिटी’ विभाग आहेत. दातांवरील उपचारांमध्ये अद्ययावत आणि सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानासह वैद्यकीय सेवा देणा-या या महाविद्यालयात संबंधित उपचारांसाठी 187 डेंन्टल चेअर असून, उपचारासाठी भरती होणाऱ्या रुग्णांसाठी 20 खाटांचा अद्ययावत विभाग देखील आहे. विशेष म्हणजे स्वतंत्र व समर्पित शस्त्रक्रियागृह (Operation Theatre) असणारे हे देशातील एकमेव दंत महाविद्यालय आहे.






























































