मुंबईत नवी 61 लसीकरण केंद्रे! 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्यासाठी पालिकेचे नियोजन

प्रातिनिधिक फोटो

केंद्र सरकारने 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केल्यामुळे पालिकेनेही तातडीने नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये मुंबईत पश्चिम, मध्य आणि हार्बर अशा तिन्ही रेल्वे लाइनवरील स्टेशन परिसरात लसीकरण केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे 56 ठिकाणे निश्चित करण्यात येतील. यामुळे पालिकेच्या लसीकरण केंद्राची संख्या 39 वरून 100 पर्यंत वाढवण्यात येणार आहे. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिली.

1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरण करण्यात येणार असल्यामुळे पालिकेनेही नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. लसीकरणासाठी पालिकेच्या कर्मचाऱयांनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी लसींच्या साठवणुकीसाठी आवश्यक कोल्ड स्टोरेजची व्यवस्थाही वाढवण्यात येईल. स्पुटनिकसह केंद्र सरकार ज्या लसी वापरण्यास परवानगी देईल त्या लसी वापरण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत पालिकेकडे पुरेसा लसींचा साठा असून आवश्यक साठा येत आहे.

पालिका ऑक्सिजन बनवणार

मुंबईत ऑक्सिजन तुटवडा पडू नये यासाठी पालिका जम्बो कोविड सेंटर्स आणि कुर्ला भाभा, गोवंडी शताब्दी अशा 12 ठिकाणी ऑक्सिजन निर्माण करण्यासाठी प्लांट तयार करणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.

पालिकेची 39, राज्य-केंद्र सरकारची 17 आणि खासगी 73 अशा 129 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. दररोज 40 ते 50 हजार डोस देण्यात येत आहेत. यामध्ये आतापर्यंत सुमारे 20 लाख जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. आगामी काळात ही संख्या वाढवणार आहे.

ऑक्सिजन राखीव ठेवून पुरवठय़ाचे व्यवस्थापन

मुंबईला सद्यस्थितीत दररोज 235 मेट्रिक टन ऑक्सिजन लागत आहे. यामध्ये आणखी 50 मेट्रिक टन साठा मुंबईला मिळणार आहे. ऑक्सिजन तुटवडा जाणवू नये यासाठी 20 टक्के कोटा राखीव ठेवून पुरवठय़ाचे नियोजन करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या