
कांद्याचे गगनाला भिडणारे भाव कमी करण्याच्या हेतूने सरकारी व्यापारी कंपनी एमएमटीसी तब्बल 6 हजार 90 टन कांदा आयात करणार आहे. गेल्याच आठवडय़ात झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 1.2 लाख टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यापैकी 6,090 टन कांदा सुरुवातीला आयात करण्यात येणार आहे. या महीन्यात कांद्याचे दर 100 रुपये प्रतिकिलो इतके झाले. दिल्लीत हे दर 70 रुपये इतके होते.
ग्राहक व्यवहार सचिव ए.के.श्रीवास्तव यांनी अलिकडेच विविध राज्यांच्या मागण्यांबाबतची आढावा बैठक घेतली. एमएमटीसीने कांद्याच्या आयातीबद्दल इजिप्तशी करार केला असून येथून मुंबई बंदरात लवकरच हा कांदा आणण्यात येणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी अन्न मंत्री राम विलास पासवान यांनी यंदा खरिप हंगामात कांद्याच्या उत्पादनात 26 टक्क्यांची घट झाल्याचे नमुद केले होते.
खरीप हंगामात कांद्याच्या पिकांचे मोठे नुकसान
लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला अन्न मंत्री विलास पासवान यांनी दिलेल्या लेखी उत्तरात कांद्याचे उत्पादन, आयातीची गरज आणि नुकसान याबाबतची माहिती दिली. जुलै ते ऑक्टोबर दरम्यान मार्केटमध्ये रब्बी हंगामात साठवलेला कांदा बाजारात आला. खरीब हंगामातील कांदा अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे उशीरा बाजारात आला. परिणामी कांद्याचे दर प्रचंड वाढले. कर्नाटक, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात कांद्याच्या पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाल्याचे पासवान म्हणाले.

























































