मुंबईकरांचा घसा बसला! कोविडचा नवा व्हेरिएंट तर नाही ना?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत सध्या घसाच नव्हे, तर छाती फोडणाऱया विचित्र प्रकारच्या खोकल्याची साथ पसरली आहे. घसादुखीने सुरुवात होते आणि हळूहळू सर्व शरीराला त्याचा त्रास होतो असा हा खोकला आहे. घसा बसतो, आवाज बदलतो आणि रात्रीची झोप उडवणारा हा खोकला औषधे घेतल्यानंतरही किमान तीन आठवडे साथ सोडत नाही. सरकारी आणि खासगी दवाखान्यांमध्ये अशा रुग्णांच्या रांगा लागत आहेत.

गेल्या वर्षाच्या अखेरीस मुंबईत थंडीचा कडाका होता. तेव्हापासून हा खोकला मुंबईकरांना चिकटला आहे. घशात असह्य वेदना सुरू होतात आणि नंतर असा काही खोकला येतो की, खोकल्यानंतर छाती फुटतेय की काय असा त्रास होतो. त्यानंतर सर्दी जाणवू लागते आणि नाक चोंदायला सुरुवात होते. रात्री झोपल्यानंतर आणि सकाळी उठल्यानंतर या खोकल्याची तीव्रता अधिक जाणवत आहे. दरम्यान, हा कोरोनाचा नवा व्हेरिंएंट तर नाही ना, अशी चिंता व्यक्त करत वैद्यकीय तज्ञांनी सावध केले आहे.

मुंबईतील सरकारी रुग्णालये, महानगरपालिकांची रुग्णालये आणि दवाखाने तसेच खासगी डॉक्टरांच्या दवाखान्यांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये खोकल्याच्या रुग्णांची संख्या मोठी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सध्या तरी कुणाला दाखल करण्याची आवश्यकता भासलेली नाही; परंतु असा आजार झाल्यास हलगर्जी न करता तातडीने उपचार घ्यावेत असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

निश्चितच अशा रुग्णांची संख्या वाढली आहे. खोकल्याची तीव्रता आणि त्यामुळे जाणवत असलेल्या इतर त्रासांची तपासणी करून तसेच आवश्यकता वाटल्यास अन्य वैद्यकीय चाचण्या करून रुग्णांवर उपचार केले जात आहेत. रुग्णांना दाखल करून घेण्याची गरज सध्या तरी भासलेली नाही.
– डॉ. विनायक सावर्डेकर, सर जे. जे. रुग्णालय

माझ्याकडे गेल्या दोन आठवडय़ांपासून उपचारासाठी आलेल्या रुग्णांमध्ये बहुतांशी हे खोकला व घसादुखीची तक्रार घेऊन येत आहेत. त्यांना त्यांच्यातील लक्षणांच्या आधारावर औषधे दिली जात आहेत. मुंबईत वाढलेली प्रदूषणाची पातळी आणि त्याबरोबर असलेले थंड वातावरण यामुळे हा संसर्ग अधिक तीव्र होत आहे.
– डॉ. कृष्णकांत डेबरी, खासगी फिजिशियन

खरंच हा विचित्र प्रकारचा खोकला आहे. घशाला सूज येऊन तो दुखतो. आवाज बदलतो. कफ सिरप, गरम वाफ घेऊनही रुग्णांना लवकर आराम पडत नसल्याचे दिसून येत आहे. वेगवेगळी औषधे बदलून द्यावी लागत आहेत. कारण खोकल्याबरोबर ताप, डोकेदुखी, अंगदुखी असाही त्रास होत आहे. हा खोकला पूर्णपणे बरा होण्यास तीन आठवडे तरी लागत आहेत.
– डॉ. नीलम साठे, कान-नाक-घसा तज्ञ, केईएम रुग्णालय

– कोविड-19 गेला, पण त्यानंतर कोविडचे नवनवे व्हेरिएंट समोर येत आहेत. मुंबईतील घसादुखीची लक्षणे ही कोविडप्रमाणेच समान आहेत; पण अनेक रुग्णांची कोविड चाचणी निगेटिव्ह येत आहे. कदाचित अद्यापपर्यंत न सापडलेला हा कोविडचा नवा व्हेरिएंट तर नाही ना, अशी तज्ञांना शंका आहे.
– प्रत्येक व्हेरिएंटसाठी वेगळे चाचणी किट असते. आतापर्यंतच्या व्हेरिएंटच्या चाचण्या त्या किटद्वारेच केल्या गेल्या. नवा व्हेरिएंट असेल तर तशा चाचणी किट्स वापरल्याशिवाय निदान होणारच नाही, असे तज्ञांचे म्हणणे आहे.