मुंबई पोलिसांचे ऑपरेशन मुस्कान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

18 वर्षांखालील हरवलेल्या मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलीस आजपासून महिनाभर शहरात ‘ऑपेरेशन मुस्कान’ राबवणार आहेत. या ऑपरेशनदरम्यान हरवलेल्या मुलांचा शोध घेणार आहेत.

अभ्यासाचा कंटाळा, कौटुंबिक वाद आणि अन्य कारणात्सव लहान मुले घर सोडून निघून जातात. हरवलेल्या मुलांचा शोध घेऊन त्याच्या पालकांपर्यंत पोहचवणे हे कठीण असते. कित्येकदा बेपत्ता मूल सापडल्यावर पालक पोलिसांना कळवत नाहीत. काही मुले ही घरातून पळून आल्यावर निवारा म्हणून रस्त्यावर राहतात. तेथे राहल्यावर ते व्यसनाच्या आहारी जातात. कित्येकदा मुले घरचा पत्ताही सांगत नाहीत. अशा वेळी मुलांना विश्वासात घेऊन त्याची विचारपूस करावी लागते. बेपत्ता मुलांचे वाढते प्रमाण पाहता मुंबई पोलिसांनी ‘ऑपरेशन मुस्कान’ ही मोहीम हाती घेतली आहे. संपूर्ण महिनाभर पोलीस शहरात ‘ऑपरेशन मुस्कान’ राबवणार आहेत.

‘ऑपेरेशन मुस्कान’दरम्यान जास्तीत जास्त बेपता मुलाचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱयांना देण्यात आल्या आहेत. मुलांना भिक्षा मागायला लावतात अशी ठिकाणे पोलीस शोधून काढणार आहेत. तसेच काही रेल्वे स्थानक परिसरात मुले भिक्षा मागताना आढळून येतात अशा रेल्वे स्थानकांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. जर 18 वर्षांखालील कोणी मूल हे घरकामदेखील करत असल्यास त्याची माहिती 100 किंवा 1098 वर कळवण्यात यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.