मुंबई–पुणे इंटरसिटीच्या वेळ बचतीसाठी आता तिसऱयांदा प्रयोग!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबई ते पुणे धावणारी इंटरसिटी एक्सप्रेसची पुढे आणि मागे असे डबल इंजिन जोडून होणारी ‘पूश-पूल’ चाचणी आता 26 जूनपर्यंत चालणार आहे. एरव्ही 3 तास 17 मिनिटांचा असणारा हा प्रवास डबल इंजिनांच्या ताकतीने 2 तास 35 मिनिटांत संपवण्यात तांत्रिक अडचण आल्याने आता तो 2 तास 40 मिनिटांत संपवण्यासाठी पुन्हा नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

इंटरसिटी एक्स्प्रेसची पहिली वेळ बचत चाचणी 30 मे ते 6 जूनपर्यंत घेण्यात आली. त्यानंतर चाचणीला 11 जूनपर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. आता मध्य रेल्वे पुन्हा एकदा 12 जून ते 26 जून या कालावधीत तिसऱयांदा चाचणी करून किती वेळ वाचतो ते तपासणार आहे. पूर्वी घाट सेक्शन सुरू होण्यापूर्वी एक्सप्रेसच्या मागे तात्पुरते इंजिन लावण्याकरिता इतर सर्व एक्सप्रेसप्रमाणे कर्जतला ही गाडीदेखील थांबा घ्यायची. मात्र आता पुढे व मागे अशी दोन कायमस्वरूपी इंजिने लावून ही गाडी चालविण्यात येणार आहे.

…आधी आम्हाला सवय का लावली!
कर्जत येथे बँकर इंजिन लावण्यासाठी थांबा घेतला जात होता. या गाडीला कर्जत येथून तिकीट दिले जात नाही. या गाडीतून सीएसएमटी ते लोणावळा असे वेगळे तिकीट काढीत कर्जतला ही गाडी पकडली जाते. आता पूश-पूल इंजिन लावल्यामुळे कर्जतला गाडी थांबवावी लागत नाही. यामुळे कर्जत येथून पुणे अप-डाऊन करणारे प्रवाशी प्रचंड नाराज झाले आहेत. केवळ 40 मिनिटांची बचत करण्यासाठी हा खेळ कशाला? आधी आम्हाला सवय का लावली? असा सवाल प्रवाशांनी केला आहे.

आताचे नवे वेळापत्रक…
सीएसएमटीहून सकाळी 6.50 वा. ही गाडी सुटणार आहे. दादर येथे सकाळी 6.59 वा., ठाणे येथे स. 7.17 वा., लोणावळा येथे स. 8 .37 वा., शिवाजी नगर येथे स. 9.15 वा. थांबा घेऊन एक्सप्रेस पुण्याला स. 9.30 वा. पोहोचणार आहे.