मुंबई ते पुणे आता हायस्पीड वंदे भारतने चला ! विनाइंजिनाच्या ट्रेनसेटची चाचणी होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई ते पुणे मार्गावर सेमी हायस्पीड ‘वंदे भारत’  ट्रेनची चाचणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही चाचणी यशस्वी झाली तर मुंबई ते पुणे प्रवासाचा वेळ 150 मिनिटांनी कमी होणार आहे. त्यामुळे सकाळी सीएसएमटीवरून निघाल्यास नाश्त्यासाठी थेट पुण्यातच दाखल व्हायची सोय होणार आहे.

 ‘वंदे भारत’ ट्रेन ही विना इंजिनाची दर ताशी 150 कि.मी.वेगाने धावणारी सेमी हायस्पीड ट्रेन असून तिच्या फेर्‍या सध्या दिल्ली ते वाराणसी, जम्मू ते काटरा येथे होत आहेत. या ट्रेनचा दुसरा टप्पा तयार होत असून पहिल्या दोन गाड्या लवकरच दाखल होणार आहेत. मुंबई ते पुणे महानगरांना सध्या ट्रेनने 3 तास 10 मिनिटे लागतात. जर वंदे भारत या मार्गावर धावली तर ती दोन ते अडीच तासांत पुण्यात पोहोचेल. त्यामुळे या मार्गांवर तिच्या पाच सहा फेर्‍या करता येतील. तसेच या गाडीला लोकल किंवा मेट्रोप्रमाणे मोटार असल्याने तिला घाटात मागचे इंजिन (बँकर) लावण्याची गरजच राहणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

नव्या तंत्राची सेमी बुलेट...

वंदे भारतच्या 75 गाड्या दुसर्‍या टप्प्यात तयार करण्यात येत असून त्या सर्व चेअरकारची सुविधा (बैठी आसने क्षमता) असलेल्या आहेत. त्यामुळे त्या रात्रीच्या प्रवासासाठी योग्य नाहीत. त्यामुळे मुंबई ते पुणे आरामदायी प्रवासासाठी ही योग्य ठरेल असे म्हटले जात आहे. नव्या आधुनिक ‘वंदे भारत’ ट्रेन डिस्ट्रीब्युटेड पॉवर रोलिंग स्टॉक (डीपीआरएस) तंत्राच्या आहेत. मेन लाईन आणि ईएमयू लोकल अशा दोन्ही मार्गांवर धावणारी एकच ट्रेन विकसित करण्याच्या कल्पनेतून वंदे भारतची निर्मिती करण्यात आली असून तिला सेमी बुलेट ट्रेन म्हटले जात आहे.

एसी स्लिपर कोच लवकरच येणार

वंदें भारतची एसी स्लिपर कोच गाडी 2023 मध्ये येण्याची शक्यता असून ती सीएसएमटी ते फिरोजपूर (पंजाब) या मार्गावर चालविण्याची योजना आहे. सध्या या मार्गासाठी 33 तास लागत आहेत. अलिकडेच केंद्र सरकारने 400 ‘वंदे भारत’ ट्रेन विविध महानगरात चालविण्याची घोषणा केली होती. ‘वंदे भारत’ ट्रेनसाठी अपग्रेडेशन आणि मेन्टेनन्ससाठी माझगाव-वाडीबंदर यार्डात आणि जोगेश्वरी येथे जागा देण्यात येणार आहे.