मुंबईला साथीच्या आजारांची भीती! मलेरिया, डेंग्यूचे रुग्ण वाढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर काही काळ विश्रांती घेतली आहे. मात्र त्यामुळे मुंबईला साथीच्या आजारांची भीती वाढली आहे. जून महिन्यात 12 तारखेपर्यंत मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोचे रुग्ण वाढले असून स्वाईन फ्लूचा एक रुग्ण आढळला आहे. शहरातील वांद्रे पूर्व, कुर्ला, माहीम, धारावी, वरळी या भागात मलेरिया, गॅस्ट्रोचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात सापडले आहेत.

लसीकरण आणि दरदिवशी होणाऱया कोरोनाच्या चाचण्यांमुळे मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. गेले काही दिवस मान्सूनपूर्व पावसाने मुंबईसह कोकणात जोरदार हजेरी लावली. मात्र आता पाऊस थांबल्यामुळे पावसाळी आजारांचा धोका वाढला आहे. 1 ते 12 जूनपर्यंत मलेरिया, डेंग्यू, कावीळ, लेप्टो, गॅस्ट्रो हे साथीचे आजार वाढत असून स्वाईन फ्लूचा एक रुग्ण सापडला आहे. दरम्यान, मुंबईकरांनी घर आणि घराबाहेर बरेच दिवस पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी. डासांच्या उत्पत्तीला आळा बसून मलेरिया डेंग्यूसारखे साथीचे आजार पसरणार नाही, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

1 ते 12 जूनपर्यंत रुग्णसंख्या
मलेरिया – 127
गॅस्ट्रो – 201
कावीळ – 26
डेंग्यू – 14
लेप्टो – 4
स्वाईन फ्ल्यू – 1
चिकनगुनिया – 0

मलेरिया, डेंग्यू यांसारख्या पावसाळी आजारांचे रुग्ण सापडल्यानंतर त्या रुग्णाच्या घरी आणि घराबाहेरच्या परिसरात मुंबई महापालिकेचा कीटकनाशक विभाग फवारणी करतो तसेच कशा प्रकारे अधिक काळजी घेतली पाहिजे, याची माहिती देऊन जनजागृती करतो.
– राजन नारिंग्रेकर, प्रमुख, कीटकनाशक विभाग