मुंबई विद्यापीठाच्या बी फार्मसीचा पेपर पुढे ढकलला, विधी सीईटीदेखील याच दिवशी आल्याने निर्णय 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विद्यापीठाकडून घेण्यात येणारी बी फार्मसीच्या आठव्या सत्राची परीक्षा 2 व 3 मे रोजी घेतली जाणार होती, मात्र याच दिवशी 3 वर्षांच्या विधी प्रवेशाची सीईटीची परीक्षा होणार असल्याने बी फार्मसीचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. 2 व 3 मे रोजी इतर कोणकोणत्या परीक्षा आहेत हे पाहून सुधारित परिपत्रक विद्यापीठ उद्या प्रसिद्ध करणार आहे.

 शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विधी 3 वर्षे या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी 2 आणि 3 मे रोजी घेतली जाणार आहे. सीईटी परीक्षा कक्षाने यापूर्वीचे त्यासाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे, मात्र याच तारखांच्या दरम्यान मुंबई विद्यापीठाच्या बी फार्मसीच्या सत्र 8 ची परीक्षाही असल्याने अनेक विद्यार्थ्यांची यासाठी अडचण होईल, असे लक्षात आल्याने विद्यापीठाने ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते अॅड. मातेले यांनी विद्यापीठ आणि सीईटी परीक्षा कक्षाकडे केली. त्याच पार्श्वभूमीवर विद्यापीठाकडून बी फार्मसीची परीक्षा पुढे ढकलली जाणार आहे.

दरम्यान, विद्यापीठाकडून लॉ सीईटीची परीक्षा दि. 2 व 3 मे रोजी होत आहे. यातील 2 मे रोजी फार्मसी सत्र 8 चा पेपर आहे. हा पेपर पुढे ढकलण्यात येणार आहे. तसेच दि. 2 व 3 मे रोजी  इतर कोणकोणत्या परीक्षा आहेत हे पाहून याचे परिपत्रक विद्यापीठ उद्या प्रसिद्ध केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.