मुंबई विद्यापीठातील 42 इमारतींना ‘ओसी’ देण्याबाबत बैठक घ्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कलिना येथील मुंबई विद्यापीठाच्या आवारातील 42 इमारतींना अद्याप भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळालेले नाही. त्या इमारतींना ओसी मिळण्याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱयांची तातडीची बैठक बोलवण्यात यावी अशी मागणी युवासेना सिनेट सदस्यांनी आज मुंबई महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे केली.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये 63 इमारती आहेत. नवीन चार इमारतींचे बांधकामही पूर्ण होत आले आहे. या 63 इमारतींपैकी 24 इमारतींना ओसी मिळालेली आहे. एक इमारतीला भागशः ओसी देण्यात आली आहे, परंतु 38 इमारतींना अद्याप ओसी मिळालेली नाही. या 38 आणि नवीन 4 अशा 42 इमारतींना ओसी मिळाल्यास विद्यापीठाच्या विकासाला अधिक चालना मिळेल असे निवेदन युवासेनेच्या वतीने यशवंत जाधव यांना देण्यात आले. याप्रसंगी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, महादेव जगताप, शीतल देवरुखकर आणि भारतीय विद्यार्थी सेनेचे किरण सुर्वे उपस्थित होते.