कुलगुरूंच्या दालनाबाहेर बसून बैठकीला हजेरी, ऑनलाइन व्यवस्थापन परिषदेला युवासेनेचा विरोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वेळोवेळी मागणी करूनही व्यवस्थापन परिषदेची बैठक ऑनलाइन घेण्याला युवासेना सिनेट सदस्यांनी विरोध केला आहे. ऑनलाइन बैठकीत मांडलेले प्रस्ताव, होणारे निर्णय नीट कळत नसल्यामुळे ही बैठक प्रत्यक्षपणे घेण्याची मागणी युवासनेने केली होती. मात्र ही मागणी डावलून बैठक ऑनलाइनच घेतली. याच्या निषेधार्थ युवासेना सिनेट सदस्यांनी विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमधील व्यवस्थापन परिषद सदनाशेजारी असलेल्या कुलगुरूंच्या दालनासमोर बसूनच आजच्या बैठकीला हजेरी लावली.

मुंबई विद्यापीठाची व्यवस्थापन परिषेदची बैठक महत्त्वाची असते. या बैठकीत विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाज, पायाभूत सुविधा आदी संदर्भातील महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. मात्र, मागील काही महिन्यांपासून अनेक बैठका कोणतेही कारण नसताना ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जात आहेत.

याच्या निषेधार्थ सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर यांनी कुलगुरूंच्या दालनासमोरच बसून ऑनलाइन बैठकीविराधात ठिय्या आंदोलन केले. मागील काही बैठकांमध्ये विद्यापीठातील पायाभूत सुविधा आणि इतर कामकाजासंदर्भातील कोटय़वधी रुपयांच्या टेंडरची प्रक्रिया सुरू आहे. त्याचा हिशोब सदस्यांकडून मागितला जाण्याची भीती प्रशासनाला वाटत असल्याने या बैठका ऑनलाइन घेतल्या जात असल्याचा आरोप व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रदीप सावंत यांनी केला.