
पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलने दररोज जीव मुठीत धरून दाटीवाटीने प्रवास करणाऱया हजारो चाकरमान्यांना खूशखबर आहे. चाकरमान्यांची प्रचंड गर्दी असलेल्या या मार्गावर गोरेगाव ते बोरिवली दरम्यान सहावी मार्गिका टाकली जात आहे. या मार्गिकेचे काम एप्रिल-मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे रेल्वेचे नियोजन आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर चर्चगेट-विरार दरम्यान तब्बल 25-30 अतिरिक्त लोकल चालवणे शक्य होणार आहे. नव्या लोकल फेऱया वाढणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पश्चिम रेल्वेकडून आपल्या उपनगरीय मार्गावर दररोज तब्बल 1394 लोकल फेऱया चालवल्या जातात. मात्र वसई, विरार, डहाणूपासून लाखो चाकरमानी दररोज आपल्या नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबईत येत असल्याने लोकल खचाखच भरलेल्या असतात. या लोकलने प्रवास करणे दिव्यच आहे. त्यातच याच मार्गावर लांब पल्ल्याच्या अनेक गाडय़ा धावत असल्याने लोकल गाडय़ांची लटपंती होते. त्याची दखल घेत रेल्वेने खार-गोरेगाव दरम्यान नुकतेच सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण केले असले तरी गोरेगाव-बोरिवली दरम्यान सहावी मार्गिका नसल्याने त्याचा फारसा फायदा झालेला नाही. त्याची दखल घेत पश्चिम रेल्वेने गोरेगाव-बोरिवली दरम्यान सहावी मार्गिका टाकण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले असून तब्बल साडेसात किलोमीटर लांबीचा मार्ग उन्हाळ्यापर्यंत टाकला जाणार आहे. सध्या चौथ्या आणि पाचव्या मार्गिकेवरून सोयीनुसार जलद लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ा चालवल्या जातात. मात्र सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर पाचव्या-सहाव्या मार्गिकेवरून लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाडय़ा चालवणे शक्य होणार आहे. त्यामुळे धिम्या आणि जलद लोकल मार्गावरील लोकल गाडय़ांची संख्या वाढवणे शक्य होणार आहे.
गर्दी कमी होणार
सध्या पश्चिम रेल्वेकडून 1394 लोकल फेऱया चालवल्या जात असून त्यामाध्यमातून दररोज 30 लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. तीन-चार मिनिटांनी लोकल चालवल्या जात असल्याने नव्याने लोकल चालवणे शक्य नव्हते. मात्र सहाव्या मार्गिकेमुळे रेल्वेला नवीन फेऱया चालवणे शक्य होणार असल्याने सध्याच्या लोकलमधील गर्दी कमी होऊ शकणार आहे.
गोरेगाव-बोरिवली दरम्यान सध्या सहाव्या मार्गिकेचे काम सुरू असून ते पुढील चार-पाच महिन्यांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे रेल्वे गाडय़ांच्या संचालनात आणखी सुसूत्रता येईल, गाडय़ांचे बंचिंग कमी होणार असल्याने नवीन गाडय़ा चालवणे शक्य होईल.
सुमित ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे



























































