
खुनाच्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेला व पोलिसांच्या कैदेतून पळून गेलेल्या मुख्य आरोपीस आश्रय देणारा व वेळोवेळी मदत करणाऱ्या प्राचार्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून एक एयर पिस्टल 130 छर्रे , बारूद आणि कार असा आठ लाख 15 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की पोलीस ठाणे चाकूर येथील गुन्हा रजिस्टर क्रमांक 97/2022 कलम 302,120 (ब), 34 भादवि मधील खुनाच्या गुन्ह्यातील तसेच पोलीस ठाणे चाकुर येथील गुन्हा रजिस्टर क्रमांक 99/2022 कलम 224 भा द वि मधील गुन्ह्यात फरार आरोपी नारायण तुकाराम इरबतनवाड हा मुख्य आरोपी असून गुन्ह्यातील इतर यापूर्वीच आरोपींना अटक करण्यात आली होती. परंतु नारायण हा गुन्हा घडल्यापासून फरार होता व सतत राहण्याचे ठिकाण बदलत होता त्यास अटक करण्यासाठी लातूर पोलिसांचे विविध पथके तयार करून त्याचा शोध घेण्यात येत होता.
नमूद आरोपी गुन्हा घडल्यापासून वेळोवेळी राहण्याचे ठिकाणे बदलत होता. तो फरार असलेल्या कालावधीमध्ये त्याचा मित्र व औराद शहाजानी येथे प्राचार्य म्हणून नोकरी असलेला अहमदपूर येथे राहणारा अजितसिंह रघुविरसिंह गहेरवार याने नमूद फरार आरोपीस आपल्या घरी थांबून ठेवले होते. तसेच स्वतःची कार वापरण्यास देऊन फरार आरोपीची सर्व प्रकारची सोय करीत होता, अशी गोपनीय माहिती मिळाली.
त्यावरून अजितसिंह रघुविरसिंह गहेरवार, वय 45 वर्ष ,व्यवसाय नोकरी (प्राचार्य), राहणार कुंमठा तालुका अहमदपूर, सध्या राहणार शेळगी रोड, औराद शहाजनी आज यास 3 जून रोजी औराद शहाजानी येथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एक एअर पिस्टल, 130 छर्रे, बारूद तसेच फरार आरोपीस ये-जा करण्यासाठी, फिरण्यासाठी दिलेली स्वतःची कार असा एकूण 8 लाख 15 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.




























































