पाथर्डीच्या सहायक पोलीस निरीक्षकांसह दोघे निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
police

तालुक्यातील टाकळीफाटा येथील माजी सैनिक मच्छिंद्र फुंदे खून प्रकरणात आरोपींना अटक करण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून पाथर्डीचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड व पोलीस कर्मचारी शिवनाथ बडे यांना निलंबित केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.

पाथर्डी तालुक्यातून जाणाऱ्या कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावरील टाकळीफाटा येथे हॉटेलसमोर गाडी उभी करण्याच्या कारणातून माजी सैनिक मच्छिंद्र कारभारी फुंदे यांचा खून केल्याप्रकरणातील चौघा आरोपींना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. सुधीर संभाजी सिरसाठ (26, रा. आसरानगर, पाथर्डी), आकाश पांडुरंग वारे (24, रा. शिक्षक कॉलनी, पाथर्डी), आकाश मोहन डुकरे (21, रा. विजयनगर, पाथर्डी), गणेश सोन्याबापू जाधव (23, रा. शंकरनगर, पाथर्डी) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. घटना घडल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड व पोलीस कर्मचारी बडे यांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केल्याचे चौकशीत पुढे आले आहे.