ब्लँक मॅजीकसाठी दीड वर्षाच्या बालकाचा खून, आरोपीला जन्मठेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

मालेगाव ता.अर्धापूर येथे आजीसोबत झोपलेल्या दीड वर्षाच्या नातवला पळवून नेऊन त्याचा खून करणाऱ्या मारेकऱ्याला जिल्हा न्यायाधीश ए.जी. मोहाबे यांनी जन्मठेप आणि ५ हजार रुपये रोख दंड ठोठावला आहे.

मौजे राजळा ता. औंढा जि. हिंगोली येथील राहूल ज्ञानोजी श्रीखंडे हे आपल्या सासुरवाडी मालेगाव ता. अर्धापूर येथे २ मार्च २००९ रोजी आले. त्यावेळी गावातील सुभाष नारायण वाघमारे हा त्यांच्याकडे रागाने पाहत होता. त्यावेळी त्याचे मेहुणे राजाभाऊ अटकोरे यांनी त्याला याबद्दल विचारणा केली. पण भानगड नको म्हणून श्रीखंडे कुटूंब आपल्या सासुरवाडीला गेले. राहूल श्रीखंडे यांना दोन मुली आणि एक दीड वर्षाचा मुलगा अशी अपत्ये होती. म्हणून ते आपल्या पत्नीच्या कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रीया करण्यासाठी सासुरवाडीला आले होते.

रात्री सर्व कुटुंबिय जेवण करून झोपी गेले तेंव्हा राहूल श्रीखंडे यांचा मुलगा ग्यानीरत्न (दीडवर्षे) हा आपल्या आजी आणि मामासोबत घराबाहेरच्या ओसरीवर झोपला होता. ३ मार्च २००९ रोजी पहाटे ४ वाजेच्या दरम्यान अटकोरे कुटुंबियांच्या लक्षात आले की, ग्यानीरत्न ज्या जागी झोपला होता. तेथून गायब झाला आहे. आपल्या जावयाचा मुलगा गायब झाल्याने अटकोरे कुटूंबियांमध्ये खळबळ माजली. शोधाशोध करून ग्यानीरत्न मिळाला नाही. तेव्हा या बाबत ग्यानीरत्नला सुभाष नारायण वाघमारे यांने पळवून नेले असावे अशा आशयाची तक्रार पोलीस ठाणे अर्धापूर येथे देण्यात आली. त्यावरून पोलीसांनी भारतीय दंडविधानाच्या ३६३,३६४ प्रमाणे गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास करतांना पोलीसांनी संशयित आरोपी सुभाष नारायण वाघमारे याच्या घराची झडती घेतली तेंव्हा लाकडाच्या नाटेवर एका कॅरीबॅग मधून एका लहान बालकाचा पाय बाहेर आलेला दिसला. बालकाचे प्रेत पाहिले तेव्हा त्याच्या गळ्याला दोरीने आवळलेले दिसले. या बालकाला त्या त्रासाने शौच झालेले होते. या गुन्ह्यात कलम ३०२ आणि २०१ ची वाढ झाली. सुभाष वाघमारेच्या घरात जादूटोणा करण्यासाठी वापरले जाणारे अनेक साहित्य भेटले. काही फोटो भेटले त्या फोटोच्या आधारे सुभाष वाघमारे हा जादुटोणा संदर्भाने काम करणारा व्यक्ती असावा, अशी शंका पोलीसांसह सर्वांनाच आली. तत्कालीन पोलीस निरीक्षक विठ्ठल अंगुले यांनी या सुभाष नारायण वाघमारेला पकडले आणि सविस्तर तपास करून त्याच्याविरुध्द न्यायालयात आरोपरोप पत्र दाखल केले.

न्यायालयात या प्रकरणाच्या सुनावणी झाली. या खटल्यात १० साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालयासमक्ष नोंदवले. उपलब्ध पुराव्या आधारे न्यायाधीश मोहाबे यांनी सुभाष नारायण वाघमारेला कलम ३०२ नुसार जन्मठेप आणि ५ हजार रुपये रोख दंड तसेच कलम ३६४ नुसार दहा वर्षे सक्तमजूरीची शिक्षा ठोठावली या दोन्ही शिक्षा वाघमारेला सोबत भोगायच्या आहेत. अशी माहिती अ‍ॅड. यादव तळेगावकर यांनी दिली.