जालन्यातील एरंडवड गावात मायलेकांचा निर्घृण खून; दोन गंभीर, 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना तालुक्यातील एरंडवडगाव येथे किरकोळ कारणावरून मायलेकांचा निर्घृण खून केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी 10 जणांविरुद्ध जालना तालुक्यातील सेवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एरंडवडगाव शिवारात असलेल्या अचानक तांडा येथे देविलाल सिल्लोडे यांची गावाजवळच शेती आहे. या शेतात गावातील शिंदे कुटुंबातील काही मुले सराईत चोरटे असून ते रात्री चोऱ्या करून आल्यानंतर लपून बसत. तसेच, याच शेतात नेहमीच शौचाला बसतात. या सर्व प्रकारांना सिल्लोडे कुटुंबातील सदस्यांचा विरोध होता. शुक्रवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास शेतात शौचाला बसण्यास विरोध केल्याच्या कारणावरून सिल्लोडे यांच्या कुटुंबाला दहा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करीत चाकूने भोसकले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्यांना तातडीने जालना येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, तत्पूर्वीच सुमनबाई देविलाल सिल्लोडे ( 55) आणि मंगेश देविलाल सिल्लोडे (25) या मायलेकाचा रस्त्यातच मृत्यू झाला. तर देविलाल सिल्लोडे आणि योगेश सिल्लोडे यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या प्रकरणी सेवली पोलिसांनी विजय शिंदे, सुधाकर शिंदे, शीतल शिंदे, तुकाराम शिंदे, मुंगळ्या भोसले, छकुली शिंदे, रंजना पवार, सुरेखा शिंदे, चिंटू शिंदे आणि एक जण अशा दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक उबाळे करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, परतूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे, मौजपुरीचे सहायक पोलीस निरीक्षक विलास मोरे पाटील, सेवलीचे सहायक पोलीस निरीक्षक एन. एन. उबाळे, परतूरचे पोलीस उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे आदींनी रात्रीच तातडीने घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.