
सांगोला तालुक्यातील एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना एखतपूर-अचकदाणी रस्त्यावरील एखतपूर शिवारात शनिवारी पहाटे उघडकीला आली आहे. याप्रकरणी सांगोला तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय तुकाराम इंगोले (रा. एखतपूर, ता. सांगोला) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सुनील तुकाराम इंगोले यांनी फिर्याद दिली आहे.
संजय इंगोले हा आईसह एखतपूर-अचकदाणी रस्त्यावरील टाक्याचे मळ्याजवळ असणाऱया शेतात राहतात. शनिवारी पहाटे सांगोला पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंतकुमार काटकर व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी एखतपूर-अचकदाणी रोडवर गस्तीवर होते. त्यावेळी त्यांना अचकदाणी रोडलगत एक तरुण मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यांनी घटनेची माहिती वरिष्ठांना दिली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुल्ले, हेमंतकुमार काटकर, पोलीस उपनिरीक्षक संदेश नाळे यांनी घटनास्थळावर येऊन पाहणी केली.

























































