
स्पेनचा ‘लाल मातीच्या कोर्टचा सम्राट’ म्हणून ओळखल्या जाणाऱया स्पेनच्या राफेल नदालने आज रोलँड गारोसवर आपलाच शिष्य नॉर्वेच्या कॅस्पर रुडला 2 तास 18 मिनिटांच्या प्रदीर्घ अंतिम झुंजीत टेनिसचे धडे देत 6-3 , 6-3 , 6-0 असे सरळ सेट्समध्ये पराभूत केले आणि आपल्या 14व्या फ्रेंच ओपन जेतेपदासह 22 व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाला गवसणी घातली. नदाल सर्वाधिक पुरुष एकेरी ग्रँड स्लॅम जिंकणारा जगातला पहिला टेनिसपटू ठरला आहे. स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर आणि सर्बियाचा नोवाक जोकोविच यांच्या नावावर 20-20 पुरुष एकेरी टेनिस विजेतीपदे आहेत.
यंदाच्या फ्रेंच ओपनमध्ये पुरुष एकेरी अंतिम फेरीत अनुभवी राफेल नदाल आणि बालपणात नदाल टेनिस अकादमीत प्रशिक्षण घेणारा त्याचा शिष्य नॉर्वेचा कॅस्पर रुड यांच्यात सामना रंगला. या लढतीत गुरू नदालने रुडला टेनिस खेळाचे धडे देत त्याच्यावर सरशी मिळवली. गुरूच्या अनुभवापुढे रुडचा अनुभव कमी पडला आणि त्याला सरळ तीन सेट्समध्ये पराभव पत्करावा लागला. 36 वर्षीय नदालने वाढत्या वयातही आपल्या फिटनेसच्या अफलातून खेळाने आपले 14वे फ्रेंच ओपन विजेतेपद जिंकले.
फ्रेंच ओपनची एकही फायनल हरला नाही
क्ले म्हणजे मातीच्या कोर्टचा बादशहा मानला जाणाऱया स्पेनच्या राफेल नदालने रोलँड गारोसच्या लाल मातीच्या कोर्टवर 14 वेळा अंतिम फेरी गाठली आहे. प्रत्येक फायनल जिंकण्याचा पराक्रम त्याने नोंदवला आहे. 2005 मध्ये त्याने आपले पहिले फ्रेंच ओपन जेतेपद जिंकले होते. त्यानंतर 2006, 2007 , 2008, 2010, 2011, 2012, 2013, 2014, 2017, 2018, 2019, 2020 आणि 2022 अशा 14 फायनल आणि विजेतीपदे पटकावण्याचा पराक्रम नदालने नोंदवला आहे. या मातीच्या कोर्टवरील हुकूमत पाहूनच टेनिस शौकिनांनी नदालला ’क्ले कोर्टचा बादशहा’ असे नाव प्रेमाने दिले आहे.

























































