
नगर महापालिकेमध्ये बांधकाम पूर्णत्व दाखल्यांचा (कम्प्लिशन सर्टिफिकेट) घोटाळा उघडकीला आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश नगररचना विभागाला दिल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिली आहे. दरम्यान, नगररचनाकार राम चारठाणकर यांना यासंदर्भात नोटीसही बजावली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नगर महापालिकेत पथदिवे घोटाळा, घनकचरा घोटाळ्यापाठोपाठ आता कम्प्लिशन सर्टिफिकेटचा घोटाळा उघडकीला आला आहे. दैनिक ‘सामना’तून याबाबतचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नगररचना विभागाने नागरिकांना घर बांधल्यानंतर कम्प्लिशन सर्टिफिकेट देताना बोगस सर्टिफिकेट दिल्याचे समोर आले आहे.
महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी याची गांभीर्याने दखल घेतली आहे. हा प्रकार अतिशय गंभीर आहे. नगररचना विभागाने याबाबतची माहिती देणे अपेक्षित होते. याबाबत आम्ही संबंधित विभागाला त्याची माहिती मागवतच आहोत. दुसरीकडे नगररचनाकारांना नोटीस बजावण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, नगर महापालिकेत घोटाळ्यांचे सत्र सुरूच आहे. कोटय़वधींच्या पथदिवे घोटाळ्यात तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल असून, अनेक अधिकारी, कर्मचाऱयांना अटक झाली होती. त्यानंतर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी कोरोना काळातील घनकचरा घोटाळा उघडकीला आणला होता. त्याची चौकशी सुरू असतानाच आता कम्प्लिशन सर्टिफिकेटचा घोटाळा उघड झाल्याने महापालिकेच्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ज्यांना बांधकाम पूर्णत्वाचे दाखले दिले, ते योग्य होते की, बनावट याचीही पडताळणी करावी लागणार आहे.




























































